कमवा शिका योजनेतील घोटाळ्याचा अहवाल सादर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:11 PM2019-06-26T12:11:04+5:302019-06-26T12:13:52+5:30
कमवा व शिका योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारातील दोषींवर विद्यापीठाकडून काय कारवाई केली जाते,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल मंगळवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना सादर केला. त्यामुळे दोषींवर विद्यापीठाकडून काय कारवाई केली जाते,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
राज्यातील विविध भागातून विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे राबविल्या जाणा-या कमवा व शिका योजनेत सहभागी करून घेतले जाते.त्यामुळे विद्यार्थ्यांना काम करून उदर्निवाह व शिक्षणासाठी आवश्यक रक्कम मिळते. या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे असंख्य विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेत झालेल्या गैरव्यवहारामुळे चांगल्या योजनेला गालबोट लागले. त्यामुळे विद्यापीठातर्फे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीत स्थापन करण्यात आली .त्यातच सोमवारी पावसाळी अधिवेशनात विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली.त्यावर उच्च शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.
विद्यापीठाने स्थापन केलेल्या अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मंगळवारी बैठक झाली.या बैठकीस व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय चाकणे,माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.मनोहर जाधव,विधी विभागाच्या प्रमुख डॉ.दुर्गाम्बिनी पटेल,अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.या समितीने योजनेत झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून मंगळवारी अंतिम अहवाल तयार करून विद्यापीठाला सादर केला.
डॉ.अरुण अडसूळ म्हणाले,चौकशी समितीने सर्व बाबींचा अभ्यास करून कमवा व शिका योजनेत गैरव्यवहार करणा-या दोषी व्यक्तींचा पुराव्यासहीत अहवाल तयार केला.तसेच सर्व सदस्यांच्या उपस्थितीत कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांना अहवाल सादर केला.
काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना कमवा व शिका योजनेत प्रवेश देवून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे. त्यामुळे काम न करता योजनेच्या लाभाची रक्कम ज्यांच्या खात्यात जमा झाली ; त्या विद्यार्थ्यांवरही कारवाई करावी. तसेच विद्यापीठातील विभागांमध्ये प्रवेश घेवून विभागात सातत्याने गैरहजर राहणा-या आणि केवळ कमवा व शिका योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यांचीही विद्यापीठाने चौकशी करावी,अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी डॉ.अरूण अडसूळ यांना भेटून केली,असल्याचे बोलले जात आहे.