सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी उडवणार विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:00 AM2019-07-31T06:00:00+5:302019-07-31T06:00:06+5:30
विद्यापीठाने अमेरिका,दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हीएशन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले..
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे ‘बी.टेक. एव्हीएशन’ हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यापीठात या अभ्यासक्रमास प्रवेश घेवून विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. केवळ २० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे, असे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अदित्य अभ्यंकर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे काही वर्षांपूर्वी एम.टेक. एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला. त्यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहे. विद्यापीठाकडून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना एम.टेक एव्हिएशन अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात आहे. मात्र, आता विज्ञान शाखेतून ‘पीसीएम ग्रुप’ घेवून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी.टेक.एव्हीएशन या अभ्यासक्रमास प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकतीच या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.
डॉ. अदित्य अभ्यंकर म्हणाले, विद्यापीठाने अमेरिका,दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हीएशन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करताना दीड वर्ष प्रत्यक्ष विमान उडविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तर अडीच वर्षे विद्यापीठाच्या आवारात एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ४० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान असून त्यात विमान उडविण्याच्या प्रशिक्षण शुल्काचा समावेश केला आहे.
विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी ५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द केली असून त्यांची मुलाखत घेवून त्यातील पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातील. देशात प्रथमच बारावीनंतर चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी पदवी मिळणार आहे,असेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.
-
विद्यापीठातर्फे बी.टेक.एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला जात असून ‘पायलट’ होण्याची तीव्रइच्छा असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाईल. डॉलर व युरोचे मुल्य कमी अधिक होत असते. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे शुल्क ४० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान असेल.हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पायलटच नाही तर विमान कंपन्यांमधील इतरही पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होईल.
- डॉ.अदित्य अभ्यंकर,विभाग प्रमुख,तंत्रज्ञान विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ