सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ४० टक्के उत्तीर्णची अट या वर्षापासून होणार लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:12 PM2017-12-23T13:12:16+5:302017-12-23T13:19:16+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी स्तरावरील विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्णतेसाठी केलेली ४० टक्के गुणांची अट चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहे. त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
विधी अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी प्रत्येक विषयात किमान ३५ गुण व सरासरी ५० टक्के गुणांची अट होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुर्तीण होत होते. ही अट बदलण्याची विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत उत्तीर्णतेची अट बदलण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये विधी परीक्षेसाठी उत्तीर्णतेची अट सरसकट ४० गुणांची निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निकालातील गुतांगुत कमी होणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार, याबाबत अस्पष्टता होती. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नव्या निर्णयावरून जाहीर होईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, पहिल्या सत्राचा निकालही नव्या निर्णयानुसार जाहीर होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.