अशैक्षणिक कार्यक्रमांना विद्यापीठात बंदी, तणावाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:27 AM2017-09-15T03:27:01+5:302017-09-15T03:27:22+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांकडून आयोजित केल्या जाणाºया काही अशैक्षणिक कार्यक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच परवानगी द्यावी, अशा सूचना विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला देण्यात आल्या असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांकडून आयोजित केल्या जाणाºया काही अशैक्षणिक कार्यक्रमांमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील काळात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच परवानगी द्यावी, अशा सूचना विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला देण्यात आल्या असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले. परिणामी या पुढे समाजात घडणाºया चुकीच्या घटनांवर निषेध नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर जावे लागेल.
विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया संघटनेच्या (एसएफआय) वतीने ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात निषेध सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केला. तर आमच्या प्रश्नांची उत्तरे एसएफआयकडे नसल्याने आम्ही निषेध सभेनंतर घोषणाबाजी केल्याचा दावा अभाविपतर्फे करण्यात आला. विद्यापीठात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठात केवळ शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासच मंजुरी द्यावी, असे विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाºयांना सांगण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना समाजातील विविध घडामोडींवर आपले विचार व्यक्त करायचे असल्यास त्यांनी विद्यापीठाबाहेर कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक कार्यक्रम घ्यावेत. अशैक्षणिक कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घ्यावी, असेही शाळीग्राम यांनी स्पष्ट केले.
रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागणार
रुग्णवाहिका वेळेत न पोहचल्यामुळे विद्यापीठात पीएच.डी. करणाºया विद्यार्थ्याचा जीव गेला. त्यामुळे विद्यापीठाकडे स्वत:ची रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आले. त्यावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत रुग्णवाहिकेसंदर्भातील ठराव मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यामुळे विद्यापीठाने स्वत: रुग्णवाहिका घ्यावी किंवा भाडे करारावर विद्यापीठ परिसरात ठेवावी, यावर निर्णय घेतला जाईल.- डॉ. अरविंद शाळीग्राम,
कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ