सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑफलाइन परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:46 PM2020-10-12T14:46:05+5:302020-10-12T14:46:28+5:30
सकाळी दहा वाजता सुरु होणारा ऑफलाईन पेपर दुपारी साडेबारा वाजता सुरु झाला. तर दुपारी एक वाजता सुरू होणारा पेपर अडीच वाजले तरीही सुरू झाला नाही...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सोमवारपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू करण्यात आल्या मात्र सकाळी दहा वाजता सुरु होणारा ऑफलाईन पेपर दुपारी साडेबारा वाजता सुरु झाला. तर दुपारी एक वाजता सुरू होणारा पेपर अडीच वाजले तरीही सुरू झाला नाही. त्यामुळे विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
पुणे विद्यापीठातर्फे ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. मात्र, ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी ओटीपी पाठवला नाही. त्यामुळे सकाळी दहा वाजता सुरू होणारा पेपर साडेबारा वाजता सुरू झाला.परंतु,सर्व परीक्षा सुरळीतपणे सुरू असल्याचा दावा विद्यापीठाकडून केला जात आहे.
दरम्यान, सकाळच्या सत्रात ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ८, हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ५,७७३ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे त्यांचे पेपर सबमिट केले आहेत, तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे.
याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे, त्यांच्या परीक्षा संबंधित केंद्रांवर सुरळीतपणे सुरु आहेत. दुपारी ४ ते ५ या स्लॉट मध्ये आजच्या दिवसातील उर्वरित परीक्षा पार पडणार आहेत,अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.