सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अन् दूरस्थ अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; कसा करायचा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:20 PM2023-08-02T12:20:36+5:302023-08-02T12:25:01+5:30
दूरस्थ शिक्षण बीए, बी. काॅम. एम. ए. एम. काॅम या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक सत्र जुलै-ऑगस्ट २०२३ प्रथम वर्ष प्रवेश घेता येणार आहे...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून (दि. १) सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. दूरस्थ शिक्षण बीए, बी. काॅम. एम. ए. एम. काॅम या अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक सत्र जुलै-ऑगस्ट २०२३ प्रथम वर्ष प्रवेश घेता येणार आहे.
विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट साेडणारे तसेच नाेकरी-व्यवसाय करून शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आणि गृहिणींना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या http://unipune.ac.in/SOL या संकेतस्थळाला भेट द्यावी. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी नाेंदणी करावी. त्यानंतर प्रवेश अर्ज भरावा. प्रवेशासाठी दि. ३० ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. दि. ३१ ऑगस्टपर्यंत शुल्कासह प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. येत्या दि. २ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रत अभ्यास केंद्रावर जमा करावी लागणार आहे.
अशी असेल वेळ
ऑनलाइन नाव नाेंदणी : दि. ३० ऑगस्ट, सायंकाळी ५ पर्यंत
प्रवेश अर्ज व शुल्क भरणे : दि. ३१ ऑगस्ट
अभ्यास केंद्रावर प्रवेश जमा करणे : दि. २ सप्टेंबर दुपारी १ वाजेपर्यंत