सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारणार ‘बांबू पार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:52+5:302021-04-20T04:11:52+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच एकर क्षेत्रात बांबू पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सीएसआरच्या माध्यमातून गॅरेट मोशन ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच एकर क्षेत्रात बांबू पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सीएसआरच्या माध्यमातून गॅरेट मोशन टेक्नॉलॉजी या कंपनीने ६८ लाख ८५ हजारांचा निधी देऊ केला आहे.
सोमवारी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, नवोपक्रम, नावसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, युनायटेड फॉर नेशन या संस्थेचे संचालक सुमेध बडवे आदी उपस्थित होते.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत होणारा हा प्रकल्प ‘गॅरेट मोशन टेक्नॉलॉजी’ ही कंपनी ‘युनायटेड फॉर नेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राबविणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यापीठातील शिवाजी पुतळा परिसराच्या मागच्या बाजूस जवळपास ५ एकर जागेत सुमारे २ हजार बांबूची झाडे लावणार आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बांबू सेंटरला या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. या भागात बांबूची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने या प्रकल्पाच्या माध्यमातून बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन निधी उभा राहण्यास मदत होईल.
--
विद्यापीठात पहिल्यांदाच अशा प्रकारे बांबू पार्क उभारले जात आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याबरोबरच विद्यापीठाला अर्थार्जन करणे हा या बांबू पार्क उभारण्यामागील हेतू आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ