सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशामध्ये तिसऱ्या स्थानावर
By admin | Published: October 2, 2015 12:47 AM2015-10-02T00:47:11+5:302015-10-02T00:47:11+5:30
टाईम्स हायर एज्युकेशनच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्याच सहभागात भारतीय विद्यापीठात तिसरे स्थान पटकाविले आहे.
पुणे : टाईम्स हायर एज्युकेशनच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्याच सहभागात भारतीय विद्यापीठात तिसरे स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठातील अध्यापन हे बलस्थान ठरले असून, यासाठी विद्यापीठाला देशात दुसरे तर जगात १९१वे मानांकन मिळाले आहे. अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.
यंदा पहिल्यांदाच विद्यापीठाने ‘टाईम्स हायर एज्युकेशन’च्या वतीने निश्चित केल्या जाणाऱ्या विद्यापीठांच्या जागतिक पातळीवरील २०१५-१६या वर्षाच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीमध्ये सहभाग घेतला होता. टाईम्सने ही क्रमवारी जाहीर केली आहे. जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या सखोल माहितीचे विश्लेषणावर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर जगातील ११.३ दशलक्ष शोधनिबंध आणि ११ हजार शैक्षणिक सर्वेक्षणांचाही समावेश होता.
या क्रमवारीसाठी विविध शैक्षणिक घटकांचा विचार करण्यात आला. त्यामध्ये अध्यापन, संशोधन, सायटेशन्स, औद्योगिक संस्थांकडून प्राप्त होणारे उत्पन्न, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अध्यापन व संशोधनाबाबतचा दृष्टिकोन याचबरोबर विद्यार्थी, प्रकाशित शोधनिबंध, संशोधनाचा परिणाम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दृष्टिकोन या पातळ्यांवर क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)