सत्यधर्म प्रकाशात तेजाने तळपणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा फुलेवाड्यात घडला आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:21+5:302021-01-04T04:09:21+5:30
पुणे : केवळ महात्मा जोतिराव फुले यांची पत्नी म्हणून नाही, तर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांनी स्वतंत्र कर्तृत्वही गाजवले ...
पुणे : केवळ महात्मा जोतिराव फुले यांची पत्नी म्हणून नाही, तर सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांनी स्वतंत्र कर्तृत्वही गाजवले आहे. त्यांचे क्रांतिकारी कार्य सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महात्मा फुले वाड्यात उलगडण्यात आले.
निमित्त होते, सावित्रीबाईंच्या १९०व्या जयंतीनिमित्त ‘ओळख-अपरिचित सावित्रीची’ या कार्यक्रमाचे. सावित्रीबाईंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सादर केला. ज्यांनी स्वत:च्या जीवनात सावित्रीचा विचार अंशत: तरी उतरवला आहे. अशा सावित्रीच्या लेकरांनी तो कार्यक्रम सादर केला .
सावित्रीबाई फुले या मराठीतल्या पहिल्या आधुनिक कवयित्री आहेत. त्यांच्या ‘काव्यफुले’ कवितासंग्रहातील काही कविता सादर झाल्या. या कार्यक्रमाची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांची होती. या कार्यक्रमात अंगणवाडीताई सुनंदा दत्तात्रय साळवे, संगणकशास्त्रात एम. टेक. करणारी कल्याणी दुर्गा रवींद्र, पत्रकार पूनम बापूराव मंगल, पांडवनगरसारख्या वस्तीत राहून उच्च शिक्षण पूर्ण करणारी मंगल शाबाजी निकम, सोनी सुरेश चव्हाण, शीतल प्रकाश कोटमाळे, संगणक अभियंता निखिल दगडू रांजणकर यांचा समावेश होता. स्त्री मुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका जोशी यांनी
सूत्रसंचालन केले. फुले दांपत्याने सुरू केलेल्या १८ शाळांच्या १८ धूळपाट्या व त्यांच्या पुढे प्रकाशमान ज्ञानज्योती, दगडीशिळांचा आकार घेतलेले काव्यफुलेचे १९ शतकातील मुखपृष्ठ, गृहिणी मासिकाचे बालहत्या प्रतिबंधकगृहाची जाहिरात, सावित्रीबाईंची कविता अशा अजित पेंटर या कला शिक्षकाच्या नेपथ्याने कार्यक्रमाचा मंच जिवंत झाला. महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान, लोकायत, अभिव्यक्ती, स्वाधार महिला पंचायत, अंगणवाडी कर्मचारी सभा, शाहीनबाग (मोमीनपुरा), एसएनडीटी डीएड कॉलेज अशा विविध संस्था संघटना यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
फोटे ओळ : फुलेवाड्यात घडला सत्यधर्म प्रकाशात तेजाने तळपणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आविष्कार, स्वतःच्या जीवनातही सावित्रीचा विचार स्वीकारणाऱ्या लेकींनी उलगडले कर्तृत्वाचे अपरिचित पैलू.
(फाेटो - सावित्री प्रोग्रॅम या नावाने हॅलोसिटीमध्ये आहे.)