सावित्रीच्या लेकींनी गाजवली दिल्ली; महाराष्ट्राच्या दहापैकी दहा मुलींचा राजपथावर डंका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 01:55 PM2021-02-05T13:55:42+5:302021-02-05T13:56:43+5:30

राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता.

Savitri's girls made Delhi famous; Ten out of ten girls from Maharashtra hit the streets | सावित्रीच्या लेकींनी गाजवली दिल्ली; महाराष्ट्राच्या दहापैकी दहा मुलींचा राजपथावर डंका 

सावित्रीच्या लेकींनी गाजवली दिल्ली; महाराष्ट्राच्या दहापैकी दहा मुलींचा राजपथावर डंका 

Next
ठळक मुद्देदेशाच्या नेतृत्वासह तीन स्पर्धेत अव्वल, आरडी कॅम्पसाठी २४ जणांचा संघ

दीपक होमकर- 
पुणे : आर्मी असो, नेव्ही असो किंवा एअर विंग साऱ्याच विभागामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या गर्ल्स कॅडेटने इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सरस कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला. संपूर्ण भारतातील मुलींच्या तुकडीचे राजपथावर नेतृत्व,  एअर विंग संपूर्ण भारतातून बेस्ट कॅडेटचा किताब, नेव्हल विंगमध्ये बेस्ट कॅडेट रनरअपचा किताब आणि डायरेक्टर जनरलकडून मिळणारा डी. जी. कमांडेशचा किताब अशी सर्वोत्तम कामगिरी करत सावित्रीच्या लेकींनी दिल्ली गाजविली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त (आर. डी. कॅम्प) दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या शिबिरातील सर्वच स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने यश मिळविले, त्यामध्ये दहा मुलींनी सिंहाचा वाटा उचलला.  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा केवळ २४ जणांचा संघ आरडी कॅम्पसाठी दिल्लीत रवाना झाला होता. त्यामध्ये दहा मुली आणि चौदा मुलांचा सहभाग होता. विशेष म्हणजे, राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता. त्यामध्ये येथून गेलेल्या दहाच्या दहा मुलींची सामावेश होता, तर चौदापैकी अकरा मुलांचा समावेश होता. कॅडेट्सबरोबरच संघ व्यवस्थापक म्हणून त्यांच्या समवेत गेलेल्या बार्शीच्या मेजर आरुषा शेटे यांना सुद्धा डी. जी. कमांडेशचा किताब देण्यात आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला शक्ती दिसून आली.

 कशीश मेटवाणीसमोर आकाश झाले ठेंगणे
पुणे विद्यापीठामध्ये बायोटेक एमएससी (इंटिग्रेट मार्सस) कोर्स करणाऱ्या कशीश मेटवाणी ही यंदा महाराष्ट्र संघाकडून बेस्ट कॅडेटच्या (एअर विंग) स्पर्धेत उतरली होती, लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्चा अशा सर्व पातळ्यावंर तीने २८ राज्यांच्या मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटचा किताब पटकाविला. पुढे जाऊन फायटर प्लेन पायलेट बनण्याचे ध्येय तिने ठेवले असून त्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यास तिने सुरवात केली आहे.

 तनया नलवडेचे कर्तत्व सागराहून गहरे
पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बीएससी करणाऱ्या तनया नलवडे ही महाराष्ट्रासंघाकडून बेस्ट कॅडेटसाठी (नेवल विंग)च्या स्पर्धेत उतरली होती. लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्च अशा सर्व पातळ्यांवर तिने २८ राज्यांच्या सर्व मुलींना मागे टाकत बेस्ट कॅडेटच्या दुसऱ्या क्रमांकाचा किताब पटकाविला. आंध्र प्रदेशच्या नेव्हल विंगच्या मुलीने तिच्यावर केवळ एक गुणानी मात केली.  विमाननगर येथील एअरफोर्स स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले असले, तरी तिने इंडियन नेव्हीमध्येच करिअर करायचे ठरवले आहे.

समृध्दी संतने केले देशाचे नेतृत्व
अमरावती येथील महाविद्यालयात शिकणारी समृध्दी संत हिने राजपथावर झालेल्या संचलनात मुलींच्या राष्ट्रीय तुकडीचे नेतृत्व केले. २८ राज्यांतून आलेल्या सर्व मुलींमधून सुमारे शंभर मुलींची निवड राजपथावरील संचलनासाठी झाली होती. त्या शंभर मुलींचे नेतृत्व करण्याचा बहमान समृध्दीला मिळाला. इंडिअन आर्मी मध्ये करीअर करण्यासाठी तीने यूपीएसची तयारी सुरू केली असून त्यासाठी एनसीसीची विशेष मदत तिला झाल्याचे तिने सां.गितले

द्यानवी ककोनियाला अधिकाऱ्यांची पसंती
पुण्यातील मॉडर्न कॉलेजध्ये बीएससी बायोटक करणारी द्यानवी ककोनियाला हिने डीजी कमांडेशन हा किताब पटकाविला. एनसीसीमधील तीन वर्षांत कॅडेटची संपूर्ण कामगिरी कशी आहे त्यावरून हा किताब दिला जातो. या स्पर्धेसाठीही २८ राज्यांतून आलेल्या मुलींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये द्यानव सर्वोत्तम ठरली. इंडियन आर्मीमध्ये करिअर करणार असून त्यासाठी तिने डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षांचा अभ्यास सुरु केला असल्याचे सांगितले.
 

Web Title: Savitri's girls made Delhi famous; Ten out of ten girls from Maharashtra hit the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.