सावित्रीच्या लेकींची चिखलपीट; नाणे मावळात शिक्षणाची बिकट वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:35 AM2018-07-28T03:35:44+5:302018-07-28T03:36:02+5:30
रस्ते व वाहतुकीची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींची गैरसोय
- विजय सुराणा
वडगाव मावळ : गावाजवळ शाळा नाही़ दोन ते तीन किलोमीटर दूर असलेल्या वाहतूक सुविधेच्या ठिकाणी वेळेत एसटी बस येत नाही. त्यामुळे खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन खड्डेमय रस्त्यावरून नाणे मावळातील दुर्गम भागातील सुमारे दोनशे विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज १० किलोमीटरची पायपीट करीत आहेत. सावित्रीच्या या लेकींना गावाजवळ शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्हा परिषदेची भाजगाव येथे शाळा असून, पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथून पाच किलोमीटर अंतरावर उंबरवाडी व कोळवाडी आहे. या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील मुला-मुलींना भाजगाव येथे शाळेसाठी जावे लागते. मुलींची संख्या त्यात अधिक आहे. भाजगावला जाण्यासाठी एसटी नाही. त्यामुळे दररोज १० किलोमीटरची पायपीट करावी लागते. उकसान व पाले येथेही हीच स्थिती.
उकसान व पाले येथील विद्यार्थी यांची या मुलींप्रमाणेच परवड आहे. या ठिकाणी चौथीपर्यंत शाळा आहे. त्यांना ७ किलोमीटर
अंतरावरील करंजगाव व कामशेत येथे शाळेत जावे लागते. हे सर्व विद्यार्थी खडकी फाट्यावर एसटी किंवा खासगी वाहनाने उतरतात. तेथून पायी जावे लागते.
एकही मुलगी नाही पदवीधर
नाणे मावळातील दुर्गम भागातील काही विद्यार्थिनी म्हणाल्या, आमच्या भागात गेल्या अनेक पिढ्यांपासून कोणत्याही मुलीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले नाही. शिक्षणाची ही परिस्थिती बदलण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सर्व संकटावर मात करून पायी प्रवास करत आहोत.
शाळेत जाण्यासाठी रोज ४ किलोमीटर
करंजगाव येथील शाळेतही गोवित्री, उकसान, कांब्रे, करंजगाव, भाजगाव व इतर गावातील विद्यार्थी येतात. त्यांनाही रोजची पायपीट करावी लागते. या शाळेतील आसावरी कालेकर, तनवी दहिभाते, पल्लवी मोहिते, निकिता ठाकर, प्रजेत जाधव व अन्य मुलींनी सांगितले आम्हाला दररोज येऊन जाऊन चार किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. शासनाने डोंगरी व दुर्गम भागातील मुलींसाठी सायकल वाटप केले पाहिजे.