तरुण कलाकारांच्या सादरीकरणाने रंगणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 05:53 PM2017-11-15T17:53:51+5:302017-11-15T17:54:12+5:30
पुणे : सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेला यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १३ ते १७ डिसेंबर दरम्यान रमणबाग प्रशालेत रंगणार आहे.
पुणे : सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेला यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १३ ते १७ डिसेंबर दरम्यान रमणबाग प्रशालेत रंगणार आहे. दिगग्ज आणि युवा आशा २८ कलाकारांच्या सादरीकरणाने यंदाचा महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉ. विजय रजपूत यांचे गायन होईल. कोलकाताचे देबाशीष भट्टाचार्य यांचे चतुरंगी वादन होईल. याच दिवशी पं. राजन आणि साजन मिश्रा यांचे गायन होणार आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात दुपारी ४ वाजता कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या गायनाने होणार आहे. पतियाळा घराण्याच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होणार आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने होणार आहे.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या गायत्री जोशी यांच्या गायनाने होईल. कोलकाताचे सेनिया घराण्याचे सतारवादक कुशल दास यांचे सतारवादन रसिकांना श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. पतियाळा घराण्याचे गायक सम्राट पंडित यांचे गायन होईल. तिस-या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.
चौथ्या दिवशी दुपारी ३ वाजता कोलकाताचे संगीत रिसर्च अकादमीचे प्राध्यापक तुषार दत्ता यांच्या गायनाचा अनुभव श्रोत्यांना घेता येणार आहे. यानंतर मूळचे काश्मीरचे असलेले अभय रुस्तम सोपोरी यांचे संतुरवादन अनुभवता येणार आहे. यानंतर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांचे गायन होईल. यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर यांचे गायन होईल. कथक नृत्यांगना प्राची शहा यांचे सादरीकरण यावेळी होणार आहे. ज्येष्ठ गायिका पदमा तळवलकर यांच्या गायनाने चौथ्या दिवसाची सांगता होणार आहे. परवानगी मिळाल्यास या दिवशी रात्री 12 पर्यंत महोत्सव सुरू राहील.
१७ डिसेंबर रोजी दुपारी ११.४५ ते रात्री १० या एका वेळेत सत्र रंगणार आहे. यादिवशी महेश काळे, सुधाकर चव्हाण यांचे गायन, पदमा शँकर यांचे व्हायोलिनवादन, राजन कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांचे सरोडवादन होणार आहे. शेवटच्या टप्प्यात आंनद भाटे यांचे गायन, उस्ताद शुजात खान यांचे स्टार वादन होईल. डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल.