Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 : व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने
By श्रीकिशन काळे | Updated: December 19, 2024 11:25 IST2024-12-19T11:22:55+5:302024-12-19T11:25:25+5:30
- पं. अजय चक्रवर्ती यांच्या कसदार गायनाने सवाईच्या पहिल्या दिवसाचा समारोप

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2024 : व्हायोलिनवादनाने जिंकली रसिकांची मने
पुणे : विख्यात व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांनी त्यांचे पुत्र व शिष्य अंबी सुब्रमण्यम यांच्या साथीने उभे केलेले अद्भुत स्वरविश्व आणि ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे कसदार गायन यांमुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध संस्मरणीय ठरला.
डॉ. सुब्रमण्यम यांनी कर्नाटक शैलीतील राग अभोगी, राग नासिका भूषणी मधील रागम् तालम् पल्लवी अशा क्रमाने वादनाचे अनेक पॅटर्न सादर केले. पाश्चात्त्य अभिजात संगीताची झलकही त्यांनी प्रस्तुत केली. वादनातून विविध प्रकारच्या स्वराकृती साकारत असतानाच त्यांनी तालातील मात्रांचे खंड करून गुंतागुंतीच्या रचना सादर करून दाद मिळवली. त्यांनी सादर केलेली पावणेसहा मात्रांची बंदिश वेगळेपण जपणारी होती. सहवादकांसह जुगलबंदी पद्धतीने केलेले वादनही रंगतदार ठरले. कर्नाटक शैलीतील संगीत आणि अभिजात पाश्चात्त्य संगीत यांचे फ्युजनही वैशिष्ट्यपूर्ण होते. मिश्र, चतुश्र तसेच संकीर्ण स्वरूपाचे हे सादरीकरण रसिकांना इतके भावले की, रसिकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली.
पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या अभिजात गायनाने ‘सवाई’च्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. पं. चक्रवर्ती यांनी प्रारंभी उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण केली. हा क्षण भावुक करणारा आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके उस्ताद झाकीर हुसेन आपल्याला सोडून गेले आहेत. खरे तर सोडून गेले असे म्हणता येणार नाही, ते इथेच आहेत, याची मला खात्री आहे; कारण संगीत कधी थांबत नाही; थांबणारही नाही. झाकीर हुसेन यांना प्रणाम करून मी सादरीकरणाला सुरुवात करतो, असे ते म्हणाले.
ठुमरी गायनाविषयी बोलताना चक्रवर्ती म्हणाले, ‘ठुमरी हा अतिशय सुंदर गायनप्रकार आहे. ठुमरी ख्यालाप्रमाणे विस्तृत स्वरूपात गाणे शक्य आहे. मात्र, काळाच्या ओघात ठुमरी आकसली आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या व्यासपीठावर एखादी संध्याकाळ किंवा एखादे सत्र खास ठुमरीसाठी समर्पित करायला हवे. मी स्वतः कोलकाता येथे आयटीसी संमेलनामध्ये खास ठुमरी संमेलन आयोजित करणार आहे.’ पं. अजय चक्रवर्ती यांनी राग बिहागमधील ‘चिंता ना करे' तसेच द्रुतरचना सादर केल्या. मिश्र खमाज आणि पिल्लू रागातील ठुमरीने पं. चक्रवर्ती यांनी गायनाची सांगता केली.