सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘सवाई’चा स्वरसोहळा आजपासून रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 05:00 AM2019-12-11T05:00:00+5:302019-12-11T11:59:11+5:30
तानसेन’ आणि ‘कानसेन’ यांच्या स्वागतासाठी स्वरमंच सज्ज
पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा मेरुमणी असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरयज्ञास मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैैदानावार आजपासून (दि. ११) प्रारंभ होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘तानसेन’ आणि ‘कानसेन’ यांच्या स्वागतासाठी स्वरमंच सज्ज झाला आहे. जुन्या-नव्या कलाकारांच्या सुरावटींनी पुढील पाच दिवस महोत्सव रंगणार आहे.
सूर, ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६७वे वर्ष आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी ११ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या महोत्सवासाठी २७० बाय २२८ फूट इतका मांडव तयार करण्यात आला आहे. परिसरात तब्बल १० हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बैठक आणि खुर्च्या अशा स्वरूपात ही बैठक व्यवस्था असणार आहे. याशिवाय संपूर्ण मंडपात लावलेल्या ६ एलईडी स्क्रीन्सवर देखील रसिकांना महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
बुधवारी (दि. ११) दुपारी ४ वाजता महोत्सवाच्या स्वरसोहळयास प्रारंभ होईल. सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होईल. हे वर्ष पं. फिरोज दस्तूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधत त्यांचे शिष्य असलेले संझगिरी त्यांना आदरांजली वाहतील. यानंतर जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन होईल. यानंतर पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या असलेल्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाने होईल.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात दिवस ‘षड्ज’ अंतर्गत ‘पंडित रामनारायण - अ ट्रिस्ट विथ सारंगी’ (दिग्दर्शक - व्ही. पाकिरीसामी) व ‘उस्ताद अमीर खाँ’ (दिग्दर्शक - एस. एन. शास्त्री) हे लघुपट दाखवले जाणार आहेत. ‘अंतरंग’ या उपक्रमाअंतर्गत बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांची मुलाखत मुलाखतकार अमरेंद्र धनेश्वर घेणार आहेत. गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटर शेजारील सवाई स्मारक येथे सकाळी १० ते १२ या वेळेत ‘षड्ज’ आणि ‘अंतरंग’ हे कार्यक्रम पार पडतील.
-----------
आज महोत्सवात :
गिरीश संझगिरी (गायन)
जयंती कुमरेश (वीणा वादन)
अर्चना कान्हेरे (गायन)
पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी वादन)
------------
महोत्सवाची वेळ
११ ते १३ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १०
१४ डिसेंबर - दुपारी ४ ते रात्री १२
१५ डिसेंबर - दुपारी १२ ते रात्री १०