...म्हणे ‘ब्रेक’ फेल झाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:45 PM2018-03-10T18:45:28+5:302018-03-10T18:45:28+5:30
पुणे : खरंच प्रत्येक वेळी ब्रेक फेल होते का ?
पुणे : ‘काही कामानिमित्त मी रामकृष्ण परमहंस नगरच्या फलकाजवळ उभी होते. मला रस्ता ओलांडायचा होता. पौड गावाकडून पीएमपी बस येत होती. मी ज्या ठिकाणी उभी होते, त्याच ठिकाणी ती बस येऊन धडकली. माझ्या काही अंतरावर ती बस थांबली. जर ब्रेक फेल झाले असते, तर ती थेट फलकावर येऊन धडकली असती. परंतु, चालकाच्या निष्काळजीपणामुळे ती बस पादचारी मार्गावर आली. सुदैैवाने बससमोर कोणी आले नाही, अन्यथा ‘काळ’ आलाच होता...’ हे बोल आहेत कोथरूडमध्ये झालेल्या पीएमपी बस अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी अॅड. विंदा महाजन यांचे.
पीएमपीचे ब्रेक फेल होण्याचा प्रकार नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांची ती ‘परंपरा’ आहे. परंतु, खरंच प्रत्येक वेळी ब्रेक फेल होते का ? कारण आज (दि.१०) कोथरूड येथील रामकृष्ण परमहंस नगरमध्ये सकाळी पीएमपी बस पादचारी मार्गावर धडकली. तेव्हा चालकाने बस फेल झाल्याचे सांगितले. पण, या ‘फेल’ झालेल्या बसच्या अगदी समोरच उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी मात्र वेगळीच माहिती समोर आणली आहे. ब्रेक फेल झाला असता, तर बस पुढे येऊन फलकाला किंवा इतर ठिकाणी धडकायला हवी होती. तसेच काहीच झालेले नाही. बस ब्रेक दाबूनच थांबली. ब्रेक दाबल्याचा आवाजही ऐकल्याचे अॅड. विंदा महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आॅँखो देखा हाल...
सकाळी सव्वादहाच्या सुमारास कोथरूड आगाराची बस पौडगावाहून येत होती. कोथरूड पोलिस ठाण्यासमोरील बस थांब्याअगोदर बसचा वेग कमीच होता. ती बस येत असताना अचानक पादचारी मार्गावर चढली. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर ती थांबली. पादचारी मार्गावर येऊन धडकलेल्या या बसकडे अॅड. विंदा महाजन पाहत होत्या. त्या ज्या ठिकाणी उभ्या होत्या. अगदी काही अंतरावर ती बस येऊन थांबली. याविषयी अॅड. विंदा महाजन म्हणाल्या, ‘‘ही घटना झाल्यानंतर मी कंडक्टरला याबाबत विचारले, तेव्हा ते म्हणाले, ब्रेक फेल झाले आहे. त्यामुळे ही घटना घडली. मी ते ऐकून अचंबित झाले. त्यांच्याशी मला वाद घालायचा नव्हता. कारण त्यांनी ऐकले नसते. त्यामुळे मी काहीच बोलले नाही. परंतु, बसचे ब्रेक फेल झालेले नव्हते. ते झाले असते, तर बस नक्कीच कुठेतरी धडकायला हवी होती. पादचारी मार्गावर येऊन थांबली नसती.’’