दुपारी ३ पर्यंत सांगा; टिळक कुटुंबात उमेदवारी देऊ अन् लगेच हेमंत रासनेंचा अर्ज मागे घेऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 12:41 PM2023-02-07T12:41:23+5:302023-02-07T12:41:41+5:30
कसबा निवडणुकीत असे झाले तर आम्ही शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे जाहीर आभार व्यक्त करू
पुणे : टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर निवडणूक बिनविरोध करू म्हणता; तर मग उद्या दुपारी ३ पर्यंत सांगा, आम्ही लगेच हेमंत रासने यांचा अर्ज मागे घेतो आणि टिळक कुटुंबात उमेदवारी देतो, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला दिले.
बावनकुळे यांनी रात्री उशिरा शैलेश व कुणाल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलत हाेते. ते म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्या एका फोनवर माघार घेत निवडणूक बिनविरोध केली होती. कसबा निवडणुकीत असे झाले तर आम्ही शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचे जाहीर आभार व्यक्त करू.
निवडणूक नाही झाली तर भाजपचा उमेदवारच निवडून येईल आणि झाली तरीही भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आमच्या उमेदवारावरून कोणत्याही समाजाचे लोक नाराज नाहीत. टिळक कुटुंबीयही नाराज नाही. भाजपात मेरीट पाहून उमेदवारी दिली जाते, असेही बावनकुळे म्हणाले.