सांगा पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? अमित शाह यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:05 PM2019-04-19T19:05:44+5:302019-04-19T19:06:11+5:30
50 वर्ष सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही ..
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलेली असताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ही तीच परंपरा राखत पवारांवर निशाणा साधला.आम्ही जे केलं त्याचा हिशोब आम्ही दिला.मग आता पवारांनी सांगावं की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा थेट सवालही त्यांनी विचारला.
युतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ,महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, रासपचे महादेव जानकर,आमदार माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, राहुल कुल,बाबुराव पाचर्णे खासदार संजय काकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की,आमच्याकडे कोणी हिशोब मागितले नव्हता.पण आम्ही दिला.मात्र पवारांनी बारामती, पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलं हे सांगावं. लोकांना ते मागण्याचा हक्क आहे.50 वर्ष सत्तेत राहण्याची कला पवार यांच्याशिवाय कोणी करु शकत नाही.त्यांनी कुटुंबाचे राजकारण केले. त्यांना परिवाराशिवाय काहीही दिसत नाही. महाराष्ट्राला तुम्ही काय दिलंत त्याचा हिशोब सांगा.माझा युवा मोर्चाचा मुलगा तुमच्याशी बोलायला तयार आहे.शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राला 1 लाख 15 हजार करोड आणि भाजप सत्तेवर आल्यावर आम्ही 4 लाख 38 हजार 700 करोड दिले .
शाह म्हणाले, भाजपने परिवारवाद संपवला आहे.भाऊ, बहीण, मुलगी, जावई हे राजकारण नरेंद्र मोदींनी संपवले.राहुल गांधी म्हणाले, गरिबी हटवू.मी त्यांना विचारतो, की इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही तेच सांगितलं.मग त्यांनी गरिबी का नाही हटवली?ज्यांनी गरिबी अनुभवली तेच हटवू शकतात.एक चहा विकणारी व्यक्ती आज जगात देशाचे नाव चमकवत आहे.