झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार
By श्रीकिशन काळे | Published: April 25, 2023 04:30 PM2023-04-25T16:30:18+5:302023-04-25T16:30:36+5:30
बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवनासाठी नदीकाठची हजारो झाडे कापली जाणार असून तेथील जैविविधता नष्ट होणार
पुणे : नदीकाठी तोडली जाणारे वृक्ष वाचविण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि वेताळ टेकडीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, त्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे सह्याद्री देवराईचे संस्थापक व ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.
नदी पुनरूज्जीवनाचे सुरू असलेले काम आणि वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या प्रस्तावित रस्त्याबाबत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज माहिती जाणून घेतली. त्यांनी सकाळी बंडगार्डन येथे सुरू असलेल्या कामाची आणि त्यानंतर वेताळ टेकडीवर येऊन तेथील पाहणी केली. त्याबाबत योग्य व्यक्तींशी बोलू असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात दोन प्रकल्पांची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही प्रकल्प पुणे महापालिका रेटत असून, त्याला पुणेकरांचा विरोध आहे. कारण बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवनासाठी नदीकाठची हजारो झाडे कापली जाणार आहेत. तेथील जैविविधता नष्ट होणार आहे. म्हणून या प्रकल्पाची माहिती सयाजी शिंदे यांनी मंगळवारी सकाळी जाऊन घेतली. ते बंडगार्डन येथे प्रत्यक्ष गेले. तेथील सर्व पाहणी केली. या वेळी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या डॉ. सुषमा दाते, प्राजक्ता दिवेकर आदी उपस्थित होते. तर बंडगार्डन येथे जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, वैशाली पाटकर आदी उपस्थित होते.
सयाजी शिंदे यांनी बंडगार्डन येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पालिकेचे अधिकारी युवराज देशमुख, उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे, कंत्राटदार तिथे आले. त्यानंतर शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना फोनवर बोलून पुढील आठवड्यात यावर बैठक आयोजित करण्याचे सांगितले.
सयाजी शिंदे यांनी कमिशनराना फोन करून पुढील आठवड्यात संयुक्त बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. तसेच झाडांची कत्तल थांबवून जास्तीत जास्त झाडे कशी वाचतील याचा आराखडा बनवण्यास सांगितले आहे. माझ्याकडून जे शक्य होईल ते सर्व करण्याचे आश्वासन सयाजी शिंदे यांनी नागरिकांना दिले.