सयाजी शिंदेंची तत्परता ; डाेंगराला आग लागल्याचे कळताच गाडी थांबवून विझवली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 08:25 PM2020-03-08T20:25:35+5:302020-03-08T20:26:50+5:30
झाडांविषयी प्रेम असणाऱ्या सयाजी शिंदे यांना कात्रज बाेगद्याजवळील डाेंगराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवली.
पुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरालगत झाडांना रविवारी सायंकाळी आग लागली होती. या वेळी तेथून अभिनेते सयाजी शिंदे व त्यांचे मित्र जात होते, त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच गाडी थांबवत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग विझविली.
कात्रज नवीन बोगद्यालगत दोन्ही बाजूंनी डोंगर परिसर असून त्याठिकाणी झाडे आहेत. रविवारी अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्या वेळी कात्रज बोगद्याजवळ टेकडीवरील झाडांना आग लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे अभिनेते शिंदे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत पेटलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग विझविण्यास त्यांना यश आले. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना नव्हती. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यासंदर्भात, अग्निशामन दलाला याबाबत विचारले असता त्यांनी आगीचा कॉल आला नसल्याचे सांगितले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांनी आग विझविल्याची माहिती मिळाली.