‘फ्लॅट बघायला या’ म्हणत तरुणीचे ४७ हजार उकळले
By भाग्यश्री गिलडा | Published: October 9, 2023 04:01 PM2023-10-09T16:01:38+5:302023-10-09T16:01:48+5:30
फ्लॅट भाडेतत्वावर मिळवून देतो असे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार एरंडवणे परिसरातून समोर आला आहे
पुणे : फ्लॅट भाडेतत्वावर मिळवून देतो असे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार एरंडवणे परिसरात समोर आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणीने शिवकुमार यादव आणि मानब कांटी यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे मास्टर डिग्रीचा कोर्स करण्यासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीने पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्ह्टल्याप्रमाणे, तरुणीने भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी नो ब्रोकर अप्लिकेशनवर एक जाहिरात पाहिली. फ्लॅट मालकाच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, शिवकुमार यादव बोलत असल्याचे सांगून "तुम्ही फ्लॅट बघण्यासाठी या" असे सांगितले. त्याने फ्लॅटचे फोटो तरुणीला पाठवले. महिलेने फ्लॅट बघण्यासाठी संमती दर्शवल्यावर यादवने फ्लॅटपाहण्याकरता सिक्युरिटी गेट पास लागेल असे सांगून दोन हजार रुपये उकळले. त्यानंतर व्हिझिटिंग कार्ड, रेंट अग्रीमेंट, डिपॉझिट रक्कम, ऍडव्हान्स भाडे अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून एकूण ४७ हजार २९७ रुपये उकळले. पैसे देऊनही फ्लॅट भाडेतत्वावर दिला नाही आणि त्यासंदर्भात विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. याप्रकरणी संबंधित तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करत आहे.