‘पतंजली’ चे स्टोअर उघडून देतो, असे सांगून घातला साडेपाच लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 02:32 PM2021-08-08T14:32:08+5:302021-08-08T14:33:03+5:30
पतंजलीच्या उत्पादनांना चांगली मागणी लक्षात घेऊन सायबर चोरट्यांचे आता तिकडे लक्ष
पुणे : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीने देशभरात सध्या जोरदार चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीस तोड उत्पादने बाजारात आणून पतंजलीने आपला बाजारपेठेतील हिस्सा वाढवत नेला आहे. त्यामुळे पतंजलीच्या उत्पादनांना चांगली मागणी लक्षात घेऊन सायबर चोरट्यांनी आपले लक्ष तिकडे वळविले आहे. पंतजली स्टोअर उघडून देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी दोघा भावांना ५ लाख ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी बाणेर येथे राहणार्या एका ४६ वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ ऑक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०२० दरम्यान घडला.
फिर्यादी यांना एका फोन आला होता. त्यांना आणि त्यांच्या भावाला पतंजली स्टोअर एजन्सी चालू करुन देतो, असे सांगून त्यासाठी वेळोवेळी बँक खात्यावर पैसे भरायला सांगून ५ लाख ७० हजार रुपये भरले. त्यानुसार त्यांना सांगितलेल्या २ बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी पैसे भरले. त्यानंतरही त्यांना कोणत्याही प्रकारची एजन्सी मिळवून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाही.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी तपास करुन त्यांनी हे पैसे सुजीत कुमार आणि शिवशंकर यादव यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न केले असून पुढील तपासासाठी चतु:श्रृंगी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक लांबतुरे तपास करीत आहेत.