विश्रांतवाडीतील अपघातात एसबीआय अधिका-याचा मृत्यू
By Admin | Published: January 14, 2017 03:20 PM2017-01-14T15:20:37+5:302017-01-14T15:20:37+5:30
अल्पवयीन मुलगा चालवीत असलेल्या भरधाव मोटारसायकलची धडक बसल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या अधिका-याचा मृत्यू झाला.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - अल्पवयीन मुलगा चालवीत असलेल्या भरधाव मोटारसायकलची धडक बसल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या अधिका-याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अधिका-याच्या डोक्यामध्ये हेल्मेट होते. हेल्मेट तुटून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. हा अपघात शुक्रवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास लोहगाव रस्त्यावर घडला.
निनाद अंकुश दीपनायक (वय ४३, रा. परांडेनगर, धानोरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या अधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुजाता निनाद दीपनायक (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निनाद हे हवाई दलाचे अधिकारी होते.
काही काळ हवाई दलामध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडीया (एसबीआय) मध्ये नोकरी पत्करली होती. सध्या ते दापोडी शाखेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यांचे लग्न झालेले असून पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा आहे.
आरोपी अल्पवयीन मुलगा विश्रांतवाडी भागातील एका महाविद्यालयामध्ये बारावीला आहे. त्याचे वडील पेंटींगची कामे करतात. मित्राची मोटारसायकल घेऊन तो वडीलांना डबा देण्यासाठी जात होता. त्यावेळी दुचाकीवरुन निनाद बँकेमध्ये जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले होते. परंतु, अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते. दोघांच्याही वाहनांचा वेग जास्त होता.
आरोपीच्या मोटारसायकलची निनाद यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. रस्त्यावर जोरात डोके आदळल्यामुळे निनाद यांचे हेल्मेट तुटले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. तर आरोपीने मोटारसायकलचे डिस्कब्रेक दाबल्यामुळे तो उंच उडून बाजुला जाऊन पडला. त्याला किरकोळ मार लागला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय सुर्यवंशी यांनी निनाद यांना जवळच्या खासगी रुग्णालयात रिक्षामधून दाखल केले. उपचार सुरु असताना दुपारी पावणे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले. पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय सुर्यवंशी करीत आहेत.