दिवाळी अंकांच्या उत्पन्नातून 'अंनिस' चा घोटाळा, हिंदू जनजागृती समितीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:29 PM2018-11-14T17:29:17+5:302018-11-14T17:31:55+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिवाळी अंकाचे उत्पन्न लपवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिवाळी अंकाचे उत्पन्न लपवून लाखो रुपयांचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. 'अंनिस'ने यापूर्वीही आर्थिक घोटाळे केले असून या समितीवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली. यावेळी ह.भ.प. नवनाथ महाराज शिंदे, मोहन डोंगरे, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, विजय गावडे, वीरेंद्र इचलकरंजीकर आदी उपस्थित होते.
याविषयी हिंदू विधीज्ञ परिषदेने आयकर खात्याकडे तक्रार केली असून त्याविषयी कारवाई सुरू आहे. या घोटाळ्यातून मिळालेला हा काळा पैसा आहे. तो कोणाच्या खिशात गेला, त्याचा वापर कशासाठी झाला याचे उत्तर स्वतःला विवेकी म्हणवणारे अंनिसचे हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आदींनी पुरोगामी महाराष्ट्राला द्यावी असे आव्हान इचलकरंजीकर यांनी दिले.
या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप खालीलप्रमाणे :
- अंनिसने स्वतःचे आर्थिक ताळेबंद आणि कामकाजातील बदल हे शासन दरबारी वेळेत दाखल केलेले नाहीत
-अंनिस पुस्तके प्रकाशित करून त्याची विक्री केली जाते ;परंतु त्याची रक्कम हिशोबात दाखवले नाहीत.
-अंनिसच्या इतर शाखांचे उत्पन्न हिशोबात दाखवले नाहीत.
-अंनिसने शासनाला कर (अंशदान) न देता शासनाची हानी केली आहे.