जलवाहिन्यांच्या कामाच्या निविदांमध्येही घोटाळा
By admin | Published: May 3, 2017 02:41 AM2017-05-03T02:41:24+5:302017-05-03T02:41:24+5:30
टाक्यांच्या निविदा प्रकरणात गडबड झाल्यामुळे थेट राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या २४ तास पाणी योजनेतील जलवाहिन्यांच्या
पुणे : टाक्यांच्या निविदा प्रकरणात गडबड झाल्यामुळे थेट राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या २४ तास पाणी योजनेतील जलवाहिन्यांच्या कामाच्या निविदांमध्येही घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. आयुक्तांच्या मर्जीतील एका कंपनीला व त्याचबरोबर आणखी दोन कंपन्यांना फायदेशीर ठरेल याच पद्धतीने ही १ हजार ७१८ कोटी रुपयांच्या कामाची निविदा करण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ही निविदा ४ मे रोजी खुली होणार आहे. त्यापूर्वीच शिंदे यांनी निविदा दाखल केलेल्या कंपन्यांची नावे जाहीरपणे सांगितली. आयुक्तांच्या मर्जीतील एल अॅण्ड टी ही कंपनी तसेच विश्वराज व डिग्रामोंट या दोन कंपन्या अशी तीन कंपन्यांना हे काम मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. साखळी करून या तिन्ही कंपन्यांनी महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त दराने त्यांनी निविदा दाखल केलेल्या आहेत व त्यांनाच हे काम मिळणार आहे, असे शिंदे म्हणाले.
या निविदेच्या कामात काहीही संबंध नसलेले फायबर आॅप्टिकल केबल टाकण्याचे २२५ कोटी रुपयांचे कामही घुसडण्यात आलेले आहे. त्यासाठी स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभा यांची संमती घेतलेली नाही, असाही आरोप त्यांनी केला. काँग्रेसने अगदी सुरुवातीपासून पुणेकरांवर विनाकारण आर्थिक बोजा टाकण्याच्या या प्रकाराचा विरोध केला आहे. त्यामुळे आताही निविदा रद्द करण्यात आली नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. (प्रतिनिधी)