कोट्यवधींचा घोटाळा; एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर ठेकेदाराने पुणे महापालिकेला विकले
By राजू हिंगे | Updated: March 26, 2025 21:01 IST2025-03-26T21:00:31+5:302025-03-26T21:01:40+5:30
संबंधित ठेकेदाराने पालिकेच्या प्रकल्पात डांबराचा ट्रक पाठवल्यानंतर तेथे डांबर पूर्णपणे उतरवले जात नाही, अशाप्रकारे दहा ट्रक डांबराची चाेरी झाली

कोट्यवधींचा घोटाळा; एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर ठेकेदाराने पुणे महापालिकेला विकले
पुणे : महापालिका डांबर उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याऐवजी ठेकेदारामार्फत करत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे उखळ पांढरे होत असून महापालिकेचे प्रतिटन साडे सहा हजार ते सात हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्याने पालिकेला कोटयावधी रूपयांचा खड्डा पडत आहे . त्यातच महापालिकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे महापालिकेत डांबर खरेदी घोटाळा होत असल्याचा आरोप पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते ॲड. नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
पुणे महापालिका पूर्वी थेट डांबर उत्पादकांकडून (पेट्रोलियम कंपन्या) डांबर खरेदी करत होती. तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेचे तत्कॉलीन आयुक्त विक्रम कुमार यांनी थेट खरेदी बंद करत निविदाप्रक्रियेद्वारे ठेकेदारामार्फत ही खरेदी सुरू केली. एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून निविदा काढली जात असल्याने हाच ठेकेदार पात्र ठरतो. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून याच ठेकेदाराकडून डांबर खरेदी सुरू आहे. थेट कंपनीकडून डांबर घेतल्यास प्रतिटन सुमारे साडेसहा ते सात हजार रुपयांची सवलत मिळते. महापालिकेला वर्षाला सुमारे अडीच हजार टन डांबर लागते. त्यामुळे सवलतीची रक्कम मोठी आहे. मात्र, आता ही सवलत ठेकेदार घेत असून त्याला त्याचा फायदा होत आहे . डांबराचे दर हे दर पंधरा दिवसांनी बदलतात. मात्र, संबंधित ठेकेदार पालिकेला प्रचलित दरापेक्षा सहा टक्के कमी दराने डांबर पुरवतो. परंतु, पालिकेने प्रत्यक्ष बाजारातून डांबर घेतल्यास ते अधिक स्वस्त पडेल, असा दावा निलेश निकम यांनी केला.
घोटाळयाची चौकशी करा
संबंधित ठेकेदाराने पालिकेच्या प्रकल्पात डांबराचा ट्रक पाठवल्यानंतर तेथे डांबर पूर्णपणे उतरवले जात नाही. अशाप्रकारे दहा ट्रक डांबराची चाेरी झाली आहे, यात महापालिकेचे अधिकारी-कर्मचारीही सामील आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ‘पीडब्ल्यूडी’ला एक मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये डांबर खरेदीचे चलन तयार होते. त्यातून एका चलनावरील डांबर दोन ठिकाणी विकले गेले आहे का, हे समोर येते. महापालिकेला डांंबर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापािलका आणि पीडब्ल्यूडीलाही विकल्याचे काही चलनांवरून समोर आले आहे. त्यामुळे हा ठेकेदार महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांपैकी एकाची फसवणूक करत आहे, असा आरोप निकम यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.