कैद्यांसाठीच्या खरेदीतही कोट्यवधींचा घोटाळा; वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी, राजू शेट्टींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:27 IST2025-03-07T11:27:12+5:302025-03-07T11:27:58+5:30

चांगले अन्न दिले तर कारागृहात कैदी ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले असल्याचे शेट्टींनी सांगितले

Scam worth crores in purchases for prisoners in maharashtra Senior police officers also involved alleges Raju Shetty | कैद्यांसाठीच्या खरेदीतही कोट्यवधींचा घोटाळा; वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी, राजू शेट्टींचा आरोप

कैद्यांसाठीच्या खरेदीतही कोट्यवधींचा घोटाळा; वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी, राजू शेट्टींचा आरोप

पुणे : कैद्यांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सन २०२३ ते २०२५ या कालावधीत हा घाेटाळा झाला असून, यात वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी आहेत. त्यामुळेच लेखी तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतलेली नाही, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीरपणे हा आरोप केला.

तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची या संदर्भात चौकशी करण्याची मागणी आपण सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीची योग्य ती कागदपत्रे असल्याचा दावाही त्यांनी केला. शेट्टी म्हणाले, राज्याच्या सर्व कारागृहांमधील कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असते. यात अन्नधान्यापासून ते त्यांना लागणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे. खुल्या बाजारातील या मालाची किंमत व प्रत्यक्षात खरेदी बिलात लावलेली किंमत यात मोठी तफावत आहे. दिवाळीसाठी कैद्यांना द्यायचा फराळ नामांकित कंपन्यांचा, महागडा असा दाखवला आहे, प्रत्यक्षात मात्र अतिशय खराब दर्जाचा, स्वस्तातला फराळ त्यांना देण्यात आला. येरवडा कारागृहात कैदी असताना आपण स्वत: याचा अनुभव घेतला आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

स्थानिक अधिकाऱ्यांना याची विचारणा केली तर त्यांनी, चांगले अन्न दिले तर कारागृहात कैदी ठेवायला जागा शिल्लक राहणार नाही, असे उत्तर दिले असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. सरकारने या भ्रष्टाचाराची त्वरित दखल घ्यावी, चौकशी लावावी, सर्व बिले, कागदपत्रे तपासावीत, अशी मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकारी यात सहभागी असल्यानेच हा घोटाळा दडपला जात आहे, असेही ते म्हणाले.

टेंडर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि शासन नियमानुसार केलेली आहे. याबाबतची एक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने, त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत.- डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह

Web Title: Scam worth crores in purchases for prisoners in maharashtra Senior police officers also involved alleges Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.