टंचाईच्या झळा भक्तीलाही!
By Admin | Published: April 21, 2017 06:02 AM2017-04-21T06:02:38+5:302017-04-21T06:02:38+5:30
येथील मळगंगा देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. परंतु कडक उन्हाळा पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतमालाला भाव नसल्याने यात्रेला
टाकळी हाजी : निघोज (ता. पारनेर) येथील मळगंगा देवीचा यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. परंतु कडक उन्हाळा पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतमालाला भाव नसल्याने यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र रोडावली.
दरवर्षी यात्रेसाठी सहा ते सात लाख भाविक येत असतात. मात्र यावर्षी लाखभर भावकांच्या पुढे हा आकडा गेलाच नाही. परिसरात पाण्याची टंचाई आहे. येथे दिवसाआड नळपाणी पुरवठा योजनेला पाणी येते. याचा मोठा परिणाम यात्रेवर झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी निघालेल्या छबिन्याला गर्दीचे प्रमाण फारच अत्यल्प होते.
मळगंगा देवीचा जयजयकार करीत भाविकांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता निघालेल्या श्रींच्या घागरीचे दर्शन घेतले. देवीची मुख्य यात्रा बुधवारपासून सुरू झाली आहे. रात्री ११च्या दरम्यान चांदीच्या घागरीचे दर्शन भाविकांना देवीच्या हेमांडपंती बारवेत झाले. सकाळी मानकरी तसेच देवाचे पुजारी गायखेबंधू यांच्या हस्ते घागरीची पूजा करण्यात आली. त्यानंतर ही घागर मिरवणूक सुरू झाली. ही घागर दर्शनाकरिता मंदिरात ठेवण्यात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
या वेळी मळगंगा देवीच्या ८५ फूट काठीबरोबरच इतर गावांतून आलेल्या काठीची व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. तब्बल सहा तास ही मिरवणूक चालली. ढोलताशा, लेझीम पथक, झांज पथक यांच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करीत व आई मळगंगा मातेचा जयजयकार करीत निघालेल्या मिरवणुकीमुळे परिसर दणाणून गेला होता. यात्रेसाठी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट गावकरी ग्रामस्थ व विविध मंडळांनी तसेच ग्रुप ग्रामपंचायतीने चांगले नियोजन
केले होते.