ऐन रमजानमध्ये फळांची टंचाई
By admin | Published: June 3, 2017 03:02 AM2017-06-03T03:02:00+5:302017-06-03T03:02:00+5:30
रमजान सणामुळे कलिंगड, खरबुज, पपई या फळांना मागणी वाढली असली तरी शेतकरी संपामुळे मोठा तुटवडा जाणवू लागला
पुणे : रमजान सणामुळे कलिंगड, खरबुज, पपई या फळांना मागणी वाढली असली तरी शेतकरी संपामुळे मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. शुक्रवारी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात या फळांची आवक जवळपास झालीच नाही. त्यामुळे शिलकी मालाची विक्री दुप्पट
भावाने झाली.
रमजान सणामध्ये मुस्लिम बांधवांकडून उपवास सोडण्यासाठी कलिंगड, खरबुज, पपई या फळांना पसंती दिली जाते. त्यामुळे या महिन्यात प्रामुख्याने या तीन फळांना बाजारात मोठी मागणी असते. त्यानुसार शेतकऱ्यांकडूनही या काळात ही फळे बाजारात आणली जातात. पण दोन दिवसांपासून सुरू झालेल्या शेतकरी संपामुळे तीनही फळांचा तुटवडा जाणवू लागला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी या फळांची काही प्रमाणात बाजारात आवक झाली. मात्र, शुक्रवारी क्वचितच आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारात कलिंगडची सर्वसाधारण आवक सुमारे २० टेम्पो, खरबुज ४ ते ५ टेम्पो तर पपईची १५ ते २० टेम्पो आवक होत असते. मात्र, पपईची एक टेम्पो आवक वगळता इतर दोन्ही फळांची काहीच आवक झाली नाही. गुरुवारी शिल्लक असलेला खराब प्रतिचा मालच शुक्रवारी विक्री करावा लागला. मागणी असल्याने या मालालाही चांगला भाव मिळाला. खरबुजाची विक्री प्रतिकिलो २२ ते २५ रुपये, कलिंगड सुमारे १५ ते २० रुपये तर पपईची ५ ते २२ रुपयाने विक्री झाली, असे फळांचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
रमजानच्या महिन्यामध्ये रोजा सोडताना फळे खाल्ली जातात. फळांचे रस, दूध प्यायले जाते. सकाळी रोजा पकडतानाही दूध प्यायले जाते. मात्र, शेतकरी संपामुळे काही ठिकाणी फळे व दूध मिळायला अडचणी येऊ लागल्या आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर ऐन रमजानमध्ये अडचणीत वाढ होऊ शकते. रमजान ईदच्या दिवशी तर दुधाशिवाय गत्यंतर नाही.
- यासीन पाशा शेख, सचिव, बंधुभाव भाईचारा फाउंडेशन