रेबिजवरील औषधांचा ससूनमध्ये तुटवडा
By Admin | Published: February 8, 2015 11:10 PM2015-02-08T23:10:48+5:302015-02-08T23:10:48+5:30
कुत्रा चावल्यानंतर जिवघेण्या रेबीज या आजाराची लागण होऊ नये म्हणून देण्यात येणारी अॅन्टीरेबीज ही लस ससून रुग्णालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली
पुणे : कुत्रा चावल्यानंतर जिवघेण्या रेबीज या आजाराची लागण होऊ नये म्हणून देण्यात येणारी अॅन्टीरेबीज ही लस ससून रुग्णालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लसीचा तुटवडा असल्यामुळे कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर आलेल्या रुग्णांना
औषधे न देताच परत घरी पाठविले जात आहे.
पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची आणि पाळीव कुत्र्यांची संख्या खूप मोठी आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार दर वर्षाला सुमारे बारा हजार नागरिकांना भटकी कुत्री चावतात. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज हा आजार होण्याचा धोका असतो. तो झाल्यास मृत्यू ओढावतो.
यामुळे रेबीजला रोखण्यासाठी चावा घेतलेल्या रुग्णांना अॅन्टीरेबीज लस इंजक्शनव्दारे दिली जाते. ससून रुग्णालयात दिवसाकाठी कुत्र्यांनी चावा घेतलेले सुमारे २० ते २५ मोठे रुग्ण आणि ५ ते १० छोटे बालक येत असतात. या सर्वांना इक्वीरॅब या अॅन्टीरेबीजचे इंजेक्शन दिले जाते. मात्र आॅगस्ट २०१४ पासून ससून रुग्णालयाला या औषधांचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ या काळात पुरवठा करणाऱ्या २ कंपन्यांकडून अनियमित औषध
पुरवठा होत असल्याने एवढा त्रास होत नव्हता.
मात्र त्यानंतर औषधेच येणे बंद झाल्याने होती तेवढी औषधे रुग्णालयाकडून वापरण्यात आली आहेत. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून रुग्णालयात औषधेच उपलब्ध नसल्याने येणाऱ्या रुग्णांना उपचार न करताच घरी पाठवावे लागत आहे. (वार्ताहर)