रुपीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; २५ मुलांना केले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 08:13 PM2019-11-24T20:13:43+5:302019-11-24T20:19:06+5:30
कुत्र्याचा शोध घेताना महापालिका यंत्रणेची दमछाक झाली असून रात्री उशिरापर्यंत या पिसाळलेल्या कुत्रा सापडलेला नाही.
पिंपरी - महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांने रुपीनगरामध्ये धुमाकूळ घातला असून परिसरातील सुमारे २५ मुलांना जमखी केले आहे. त्यामध्ये ६ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. यातील सात जणांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतरांना विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याचा शोध घेताना महापालिका यंत्रणेची दमछाक झाली असून रात्री उशिरापर्यंत या पिसाळलेल्या कुत्रा सापडलेला नाही.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कुत्र्याने चावा घेण्याच्या प्रकारातही तितक्याच दुप्पटीने वाढ होत आहे. शहरासह उपनगरामध्ये कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. भटकी कुत्री रात्रीच्या वेळी तर पादचाऱ्यांसंह वाहनचालकांचा पाठलाग करीत असतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.
सुट्टीचा दिवस त्यांच्यासाठी दुर्देवी
रुपीनगर परिसरत आज एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. दुपारी दोनच्या सुमारास या पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्याला चावा घ्यायला सुरूवात केली. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे लहान - मोठी मुले सुट्टीचा आनंद घेत खेळत होती. या पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याला ही लहान मुले बळी पडली. ६ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे २५ मुलांना या कुत्र्याने चावा घेतला. काही मुले खेळण्यात गुंग होती, तर काही तो खेळ पाहाण्यात रमली होती. हा कुत्री मुलांच्या पाठी लागून चावा घेत होता, असे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. कुत्र्याचा चावा इतका जोरदार होता की, काही मुलांच्या पोटरीचे लचकेच त्याने तोडले. कित्येक मुलांच्या घरात घुसून या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना कडकडून चावा घेतला.
मुलांच्या पालकांनी, आजूबाजूच्या नागरिकांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये मुलांना उपचारासाठी दाखल केले. या प्रकारामुळे लहान मुले घाबरली असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या सात मुलांपैकी चार जणांच्या जखमेवर टाके घालावे लागले आहेत. त्यांच्यासह अन्य मुलांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन, तसेच औषधोपचार करून त्यांना सोडण्यात आले असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे सीएमओ डॉ. प्रकाश कोयाडे यांनी सांगितले.
यंत्रणा कमकुवत
भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी उपाययोजना राबविण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेची यंत्रणा कमकुवत ठरत आहे. एका कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी नऊशे रुपये मोजले जातात. उलट मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिकेचा पशवैद्यकीय विभाग केवळ नावापुरताच असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात हा विभाग सक्षम राहिलेला नाही, असा आरोप नागरिकांनी केला.