पाचशे रुपये न दिल्याने कोयत्याने केला दुकानदारावर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:11+5:302021-03-16T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाचशे रुपये देण्यास नकार दिला म्हणून रंगकाम करणऱ्या व्यक्तीने एका दुकानदारावर कोयत्याने वार करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाचशे रुपये देण्यास नकार दिला म्हणून रंगकाम करणऱ्या व्यक्तीने एका दुकानदारावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कळस येथील शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स येथे रविवारी दुपारी एक वाजता घडली.
विश्रांतवाडी पोलिसांनी विनोद उत्तम पवार (वय ३५, रा. रामगड वस्ती, कळस) याला अटक केली आहे. याप्रकरणी संजय लक्ष्मण गोयल (वय २८, रा. महालक्ष्मी विहार सोसायटी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
गोयल यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. पवार हा पेंटिंगचा व्यवसाय करत असून तो गोयल यांचा नियमितचा ग्राहक आहे. दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. रविवारी सकाळी पवार हा गोयल यांच्या दुकानात आला व त्याने खर्चासाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र गोयल यांनी धंदा झाला नसल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन पवार याने गोयल यांना तुझा जीवच घेतो, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर तो कोयता घेऊन पुन्हा आला. गोयल यांच्या मानेवार कोयत्याने वार करून ज्यांना जखमी केले. तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.