शहरातील देखावे ४ ऐवजी ६ दिवस १२ वाजेपर्यंत खुले : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 08:22 PM2019-08-30T20:22:42+5:302019-08-31T13:34:41+5:30
किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत...
पुणे : गणेश मंडळांना यंदाच्या वर्षी त्यांचे देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली. यापुर्वी फक्त ४ च दिवस देखावे रात्री १२ पर्यंत खुले ठेवता येत होते. आता ७ ते १२ सप्टेंबरपर्यंत म्हणजे ६ दिवस देखावे रात्री १२ वाजेपर्यंत खुले ध्वनीवर्धकासहित खुले ठेवता येतील. आवाजाची मर्यादा व अन्य नियमांचे पालन मात्र सर्व मंडळांना करावेच लागेल, अन्यथा पोलिसी कारवाई होईल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवाच्या आधी दोन वेळा पुण्यात येऊन गेलो. काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. देखावे तयार करायचे व रात्री १० वाजताच बंद करायचे याबाबत मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. त्यामुळे प्रशासनाबरोबर बोलून दिवस वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ध्वनीवर्धकाची मर्यादा तसेच अन्य नियम पाळावेच लागतील असे ते म्हणाले.
किती मर्यादापर्यंत आवाज ठेवायचा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. ती त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आवाजाची मयार्दा कमी ठेवावीच लागेल अन्यथा पोलिस कारवाई करतील असेही, पाटील यांनी सांगितले.