पुणे जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांची धुराडी झाली थंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:14 AM2019-03-22T01:14:50+5:302019-03-22T01:16:03+5:30
पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. १५ साखर कारखान्यांपैकी ११ कारखान्यांची धुराडी बंद होऊन ‘पट्टा’ पडला आहे.
सोमेश्वरनगर - पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. १५ साखर कारखान्यांपैकी ११ कारखान्यांची धुराडी बंद होऊन ‘पट्टा’ पडला आहे. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी १ लाख टन उसाचे गाळप करून १ कोटी १४ लाख क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर नेहमीप्रमाणेच १२, ११ चा सरासरी साखरउतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखरउताऱ्यात बाजी मारली आहे.
यावर्षी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊसगाळपात खाजगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर आणि भीमाशंकर अशा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणावर शिल्लक उसाचे क्षेत्र आहे. या कारखान्यांना आपल्या कारखान्यातील ऊस संपविण्यासाठी १५ एप्रिल उजाडण्याची चिन्हे आहेत. चालू हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हुमणीचा प्रादूर्भाव आणि पाण्याची कमतरता या कारखान्यांमुळे अनेक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे टनेज घटल्या कारणांमुळे हंगाम लवकर उरकले आहेत. चालू हंगामात मार्च महिन्यातच कारखान्यांनी ऊसगाळपाचा आणि साखर पोत्यांचा कोटीचा टप्पा मार्च महिन्यातच पार केला आहे. सर्व कारखाने बंद होण्यासाठी ऊस उत्पादकांना एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
जिल्ह्यातील भीमा पाटस, कर्मयोगी, नीरा भीमा, दौंड शुगर, छत्रपती, घोडगंगा, अनुराज शुगर, संत तुकाराम, राजगड, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अॅग्रो या ११ कारखान्यांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. उसाचे गाळप संपवित कारखान्यांची धुराडी बंद केली आहेत. सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भीमाशंकर हे चार कारखाने उशिरापर्यंत चालू राहण्याची चिन्हे आहेत. अनेक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील यावर्षी ऊस उत्पादकांचे उसाचे पीक उशिरा तुटल्याने गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. त्यामुळे टनेज घटून ऊस उत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. अडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना होता. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्ण ऊस संपण्यासाठी कारखान्याना अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांच्या साखरेला ३१ रुपये दिल्याने साखर कारखानदारीला सुगीचे दिवस आले आहेत. तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी व्याजासह एफआरपी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांनी गेल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना एफआरपी अदा केली आहे. तर काही दिवसांतच कारखाने व्याजासह संपूर्ण एफआरपी अदा करणार आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांना एफआरपीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
चालू हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने उसाचा गोडवा वाढला होता. त्यामुळे अनेक साखर कारखान्याना वाढलेल्या साखर उताºयाचा चांगलाच फायदा झाला आहे तर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा साखर उताºयात अनेक दिवस साडेअकराच्या आतच घुटमळत आहेत. अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले होते. मात्र, या हंगामात थंडीचे
प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना
साखर उतारा मिळत नाही.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ११ टक्के वरच घुटमळत राहिला. १२.११ टक्के साखर उतारा मिळवित सोमेश्वर कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. ११.८० चा साखर उतारा मिळवित भीमाशंकर दुसºया तर ११.११.६२ चा साखर उतारा मिळवित माळेगाव तिसºया स्थानावर आहे.
सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी १ लाख ४६ हजार ७९० में. टन ऊसाचे गाळप करून १ कोटी १४ लाख १६ हजार ७२० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
इंदापूर कारखान्याने १० लाख ४८ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ११ लाख ८७ हजार क्विंटल पोत्याचे उत्पादन घेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. बारामती अॅग्रो कारखान्याने १० लाख ३४ हजार मे. टन ऊसाचे गाळप करून ११ लाख ९९ हजार क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर दौंड शुगर कारखान्याने ९ लाख ६१ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८६ हजार पोत्यांचे उत्पादन घेत तिसरा क्रमांक पटकाविला.