लाभार्थी सोडून भलत्यालाच शिष्यवृत्ती
By admin | Published: May 7, 2017 03:00 AM2017-05-07T03:00:31+5:302017-05-07T03:00:31+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दहावी, बारावी शालांत परीक्षेतील कामगार कुटुंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दहावी, बारावी शालांत परीक्षेतील कामगार कुटुंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती लाभार्थीला सोडून भलत्याच व्यक्तीला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चूक झाल्याचे उघड झाल्यानंतर ही रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूलदेखील करण्यात आली.
२०१४-१५ या वर्षामधील दहावी, बारावी शालांत परीक्षेत गुणवत्ताप्राप्त कामगार व कामगार कुटुंबीय विद्यार्थ्यांचा सत्कार या योजनेंतर्गत गुणवत्ता प्राप्त लाभार्थीला शिष्यवृत्ती प्रदान करीत असताना अभिषेक देशमुख यांना गुणवत्ताधारक म्हणून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. मात्र, नंतर नजरचुकीने ही रक्कम अदा करण्यात आल्याची सबब मंडळाकडून देण्यात आली. तसेच आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांना अदा केलेली शिष्यवृत्तीची रक्कम पुन्हा त्यांच्याकडून वसूलही करण्यात आली.
दरम्यान, पात्र लाभार्थी सोडून इतर व्यक्तीला रक्कम अदा करण्यासारखा गंभीर प्रकार घडला असतानाही केवळ नजरचुकीने हा प्रकार घडला असल्याची सबब मंडळाकडून पुढे केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तसेच सन २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून पात्र शिष्यवृत्ती धारकास मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम धनादेशाद्वारे न देता ईसीएसद्वारे देण्यात यावी, असा निर्णय मंडळाने घेतला आहे. तरीदेखील ईसीएसद्वारे शिष्यवृत्ती प्रदान करताना अडचणी निर्माण झाल्याचे कारण देत धनादेशाद्वारेच शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली.
सावळ्या गोंधळाची सारवासारव
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योजना
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मुंबई कामगार कल्याण कायदा अधिनियमांतर्गत मंडळाला निधी देणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याची मंडळाची योजना आहे. कामगारांच्या मुलामुलींना त्या त्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाकरिता अर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागील हेतू आहे.
ढिसाळ कारभाराचा फटका
कामगार कल्याण मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा हा नमुना या प्रकरणात पहायला मिळाला. अशाप्रकारे अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कारभाराचा अनेकांना फटका बसत आहे.
चुकीच्या पद्धतीने रक्कम अदा
चुकीच्या पद्धतीने रक्कम अदा केली जाते, पुन्हा वसूलही केली जाते. मात्र, असे प्रकार घडतातच कसे, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.