शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेचा अंतिम निकाल गुणपडताळणीनंतर प्रसिद्ध केला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 02:11 AM2020-10-11T02:11:23+5:302020-10-11T02:11:39+5:30
परिषदेतर्फे १६ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा देऊन आठ महिने झाले तरी निकाल लागत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. परीक्षेचा अंतिम निकाल गुणपडताळणीनंतर प्रसिद्ध केला जाणार आहे.
परिषदेतर्फे १६ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा देऊन आठ महिने झाले तरी निकाल लागत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. निकाल प्रलंबितबाबतचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता अंतरिम निकाल जाहीर केला. हा निकाल अंतरिम असल्याने विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये २० आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील. प्रत्येक पेपरसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार असून ते आॅनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी व ग्रामीण, अभ्यासक्रम आदी दुरुस्तीसाठी २० आॅक्टोबरपर्यंत मुदत आहे.
गुणपडताळणीचा निर्णय ३० दिवसांपर्यंत कळवला जाईल. अंतिम निकाल व गुणवत्ता यादी नंतर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.
निकालासाठी संकेतस्थळ
www.mscepune.in
https://puppss.mscescholarshipexam.in