चारशे विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप ‘बार्टी’ने पाच महिने थकवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:35 AM2021-01-08T04:35:04+5:302021-01-08T04:35:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील चारशे विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या राज्यातील चारशे विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पाच महिन्यांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवले आहे. शिष्यवृत्तीची रक्कम तत्काळ देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी बार्टीसमोर बुधवारपासून (दि.५-----) बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बार्टी अंतर्गत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ९ हजार रुपये महिना शिष्यवृत्ती दिली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे प्रशिक्षण बंद झाले. परंतु ,बार्टीने ऑनलाइन प्रशिक्षणास संमती दिल्यामुळे सर्वांनी ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी आर्थिक व मानसिक तणावात अभ्यास करत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सतत परीक्षा पुढे ढकलल्याने हा ताण आणखीनच वाढला आहे. त्यातच पाच महिन्यांपासून विद्यावेतन थकवल्याची भर पडली आहे.
सुमित धानले या विद्यार्थ्याने सांगितले की, कोरोनापूर्वी बार्टीकडून विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत ऑफलाइन प्रशिक्षण दिले. दरम्यानच्या काळात प्रशिक्षण बंद होते. परंतु, सप्टेंबरमध्ये ऑनलाइन प्रशिक्षण सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणे अपेक्षित होते. मात्र, बार्टीच्या महासंचालकांनी नियम व अटी दाखवून तांत्रिक कारणामुळे विद्यावेतन देण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.