शाळाही असुरक्षित, पुण्यात मुलींच्या शाळेत शिरून ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 08:34 AM2022-03-25T08:34:01+5:302022-03-25T08:49:44+5:30
‘बाहेर कुणाला काही सांगितलेस, तर बघ’ अशी धमकी आरोपीने दिली...
पुणे : येरवडा येथील एका शाळेत शिरून एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खुनी हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच शिवाजीनगर परिसरातील एका मुलींच्या शाळेत शिरून एका नराधमाने ११ वर्षांच्या मुलीला शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षांची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकायला आहे. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करून तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरूममध्ये नेले. तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ‘बाहेर कुणाला काही सांगितलेस, तर बघ’ अशी धमकी देऊन तेथून तो निघून गेला.
या घटनेनंतर या मुलीने आपल्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना माहिती दिली. त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.
आरोपी शाळेबाहेरचा ?
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी सांगितले की, शाळेत सीसीटीव्ही आहेत. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत. शाळेत कार्यरत असलेल्या कोणा पुरुषाचे हे काम नाही, याची तपासणी आम्ही केली आहे. हा आरोपी बाहेरचा असल्याचे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव अधिक तपास करीत आहेत.
सुरक्षारक्षकाने ‘त्या’ व्यक्तीला आत सोडलेच कसे?
शिवाजीनगरमध्ये भरवस्तीत असलेल्या मुलींच्या शाळेमध्ये एका अनोळखी व्यक्तीला तेथील सुरक्षारक्षकाने सोडलेच कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण जर मुलींचीच शाळा असेल, तर ओळखपत्र दाखवून आत सोडणे आवश्यक आहे किंवा प्रवेशद्वारावरच ओळखपत्र पाहिले पाहिजे. जर ती व्यक्ती शाळेत प्रवेश करून आडनाव माहीत असलेल्या मुलीला बोलते, याचा अर्थ त्या व्यक्तीने अगोदर तिथे येऊन पाहणी केलेली असणार आहे. त्यामुळे यामध्ये प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याने जर त्या व्यक्तीला आत सोडले नसते, तर हा प्रकार घडलाच नसता, अशीही चर्चा केली जात आहे.
शिक्षिका, मुख्याध्यापकांची सतर्कता
हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापक यांनी लगेच कार्यवाही करीत पोलीस आणि पीडित मुलीच्या घरच्यांना माहिती दिली. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षिका या दोघांनी सतर्कता दाखविली. तसेच पीडित मुलीच्या मैत्रिणींनी याविषयी आपल्या शिक्षिकांना सांगितले हेदेखील योग्यच केले. कारण ‘ती’ मुलगी बोलली आणि तिच्या मैत्रिणींनी शिक्षिकांना सांगितल्यामुळे हा प्रकार समोर येऊ शकला. त्याचे रेखाचित्रही तयार होऊ शकले.