शालेय पुस्तकांनाही स्वामित्व हक्क कायदा
By admin | Published: August 5, 2015 02:59 AM2015-08-05T02:59:40+5:302015-08-05T02:59:40+5:30
बोधचिन्हांची कायदेशीर लढाई लढावी लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) शालेय पाठ्यपुस्तकांच्या स्वामित्व
पुणे : बोधचिन्हांची कायदेशीर लढाई लढावी लागल्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) शालेय पाठ्यपुस्तकांच्या स्वामित्व हक्क कायद्याबाबत सजग झाले आहे. सर्व शालेय पाठ्यपुस्तकांना स्वामित्व हक्क कायदा लागू करण्यासंदर्भात बालभारतीने कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत.
शालेय पुस्तकाचे वाचन करीत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी असे बालभारतीचे बोधचिन्ह मध्यंतरी एका चित्रपटात वापरण्यात आले. त्या चित्रपटाच्या नावापासूनच सर्व
गोष्टी शालेय विद्यार्थ्यांसाठी अनिष्ट होत्या. त्यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर बालभारतीने संबधित निर्मात्यावर कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली. त्यानंतर बोधचिन्हाचा वापर त्या निर्मात्याकडून थांबवण्यात आला.
या प्रकारानंतरच शालेय पुस्तकेही स्वामित्व हक्क कायद्याअंतर्गत नोंदणी करून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती बालभारतीकडून केली जाते. त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञांचे खास संपादकीय मंडळ नियुक्त करण्यात येते. विविध लेखकांच्या निवडक साहित्यामधून उत्कृष्ट लिखाण निवडून त्याचा समावेश धडा म्हणून करण्यात येतो. ज्या लेखकाचे साहित्य घेतले त्यांना किंवा त्यांच्या वारसांना बालभारतीकडून मानधन (रॉयल्टी) देऊन त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते.
इतके प्रयास करून तयार केलेल्या या पाठ्यपुस्तकांचा गेली अनेक वर्षे शालेय साहित्य तयार करणाऱ्यांकडून व्यावसायिक वापर केला जातो. गाईड, प्रश्नसंच, टिपा अशा विविध प्रकारांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे साहित्य अनेक कंपन्यांकडून तयार केले जाते व त्याची विक्री होत असते. या साहित्याची एक वेगळी बाजारपेठच असून, त्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.
(प्रतिनिधी)