सासवडमध्ये शाळेच्या बसला अपघात ; ७ मुले व बसचा चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 08:12 PM2019-02-14T20:12:38+5:302019-02-14T20:13:14+5:30
सासवड येथील ४ विद्यार्थ्यांना सोडवुन उर्वरीत १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी स्कूल बस भिवडी येथे जात होती.
सासवड : सासवड शहरातील पुरंदर हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हिल टॉप इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बसला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयशर टेम्पोने समोरासमोर धडक दिली. या अपघातात ७ शालेय मुले व बसचा चालक जखमी झाला आहे.
चांबळी येथिल हिल टॉप इंग्लिश मीडियम स्कूल चांबळी या शाळेची बस ही १६ विद्यार्थी व दोन मदतनिस यांना घेवून म्हाडा कॉलनीतील विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी जात होती. यावेळी सासवड येथील ४ विद्यार्थ्यांना सोडवुन उर्वरीत १४ विद्यार्थ्यांना सोडण्यासाठीती भिवडी येथे जात होती. दुपारी २ च्या सुमारास सासवड- आंबोडी रस्त्यावर पुरंदर हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वेगाने येणा-या आयशर टेम्पोने शाळेच्या बसला जोरदार धडक दिली. जोराने धडक बसल्याने बस मधील विद्यार्थी एकमेकांच्या अंगावर फेकली जाऊन ७ विद्यार्थी जखमी झाले. बसमध्ये असणारे दोन मदतनीसही किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवीत हाणी झाली नाही. जखमींना पुरंदर हायस्कूल मधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तातडीने मदत केल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात विराज शेंडगे (वय ५), मुग्धा गायकवाड (वय ५), श्रीतेज बडधे (वय ६), यश जरांडे (वय ११), ओम फडतरे (वय ६ ),अर्थव शेटे(वय ६),अराध्या चौधरी (वय ६), बसचालक चंद्रकांत रणपिसे (वय ५९) अशी जखमींची नावे असून त्यांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले.
————————————————