स्कूलबस चालकाचा सुतारद-यात खून ,कारण अज्ञात, घरापासूनच काही अंतरावर आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:38 AM2017-10-24T01:38:08+5:302017-10-24T01:38:24+5:30
कर्वेनगर : कोथरूडमधील सुतारदरा परिसरात एका वाहनचालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कर्वेनगर : कोथरूडमधील सुतारदरा परिसरात एका वाहनचालकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात
खळबळ उडाली आहे. मात्र त्याचा मृत्यू डोक्यात दगड घातल्यामुळे झाला असावा, असा कोथरूड पोलिसांचा संशय आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोथरूड प़ोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम बसप्पा घाटगे (वय ३९, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे, मूळ रा. बागलकोट, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. आज सोमवारी सकाळी १० वाजता घरापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत नागरिकांनी तातडीने कोथरूड पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात हलवले. मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले.
दरम्यान, खून कशामुळे झाला, याविषयी अद्याप काहीही अधिकृत माहिती मिळाली नसून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. परशुराम घाटगे त्याच परिसरातील रहिवासी असून, तो एका खासगी शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. शनिवारी (दि. २१) रात्री तो घरातून गेला होता आणि आज त्याचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह आढळलेल्या ठिकाणी काल रात्री पार्टी झाली असल्याचे दिसते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे पार्टीमधून काही झाले का, यादृष्टीनेदेखील पोलीस तपास करत आहेत.
ज्या ठिकाणी परशुराम घाटगे याचा मृतदेह आढळला त्या परिसरात रात्री अनेक जण दारू पीत बसलेले असतात. तो एक प्रकारे अड्डा झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सुतारदरा परिसरातून अवैध दारू विक्री चालते तिथून दारू आणायची किंवा विदेशी दारू आणून या मैदानात पीत बसण्याचे अनेकांचे उद्योग आहेत. त्यातून अनेक वेळा भांडणे, मारामाºया होत असतात. त्या वेळी या भागातून जाणाºया महिला आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. याबाबत पोलिसांना सांगूनदेखील काहीही कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.