चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात, स्कूल बसमधील मदतनीस महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:25 PM2022-11-15T15:25:55+5:302022-11-15T15:28:28+5:30
चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधून खाली पडल्याने या महिलेचा मृत्यू झाला
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : स्कूल बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे बसमधील मदतनीस महिलेला प्राण गमवावे लागले आहेत. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधून खाली पडल्याने या महिलेचा मृत्यू झाला. बालेवाडी बस डेपो परिसरात सात नोव्हेंबर रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी आता बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा राजेंद्र सूर्यवंशी (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. बस चालक नागनाथ विठ्ठलराव शाहू (वय 37) याच्या विरोधात चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेखा या बालेवाडीतील मिटकॉन इंटरनॅशनल स्कूलच्या स्कूल बस वर मदतनीस म्हणून काम करत होत्या.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सात नोव्हेंबर रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बसमधून सोडल्यानंतर सुरेखा या बसमधूनच परत जात होत्या. यावेळी चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता निष्काळजीपणे बस चालवली. भरधाव वेगात वळून घेऊन जोरात ब्रेक दाबल्याने बसच्या पायरीवर उभ्या असणाऱ्या सुरेखा सूर्यवंशी या बसमधून खाली पडल्या. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.