स्कुल बसेसची पुनर्तपासणी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:03 PM2018-06-02T22:03:32+5:302018-06-02T22:03:32+5:30
स्कुल बस नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे.
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसेस तसेच अन्य वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरीही पुनर्तपासणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केले आहे.
शहरात विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या स्कुल बसेस, व्हॅन, रिक्षांची संख्या मोठी आहे. येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे या वाहनांची तपासणी करणे, आरटीओकडून बंधनकारक करण्यात आले आहे. स्कुल बस नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार आरटीओकडून दि. २ ते १८ जून या कालावधीत वाहनांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे. त्यांचीही पुर्नतपासणी करून घेणे बंधनकारक आहे. आळंदी रस्ता चाचणी मैदानात ही तपासणी केली जाणार आहे. तपासणीचे काम कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही सुरू राहील.
स्कुल बस तरतुदींची पुर्तता करणाºया वाहनांना प्रमाणपत्र देण्यात येईल. दोषी वाहनांना त्रुटींची पुर्तता करण्याची संधी दिली जाणार आहे. या तपासणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. वाहन तपासणी करून प्रमाणपत्र न घेणाºया वाहनांना विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देण्यात येणार नाही. दि. १ एप्रिलनंतर ज्या वाहनांची नवीन नोंदणी झाली आहे किंवा योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण झालेले आहे, अशा वाहनांना पुर्नतपासणीतून सुट देण्यात आली आहे. तसेच एकाच ठिकाणी २५ किंवा त्यापेक्षा जास्त स्कुल बसेस असल्यास त्या ठिकाणीच वाहन तपासणीसाठी मोटार वाहन निरीक्षकाची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली.