स्कूलबस चालकांकडून घ्यावा चारित्र्याचा दाखला
By admin | Published: November 19, 2014 04:20 AM2014-11-19T04:20:37+5:302014-11-19T04:20:37+5:30
शहरातील नामांकित शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून चारित्र्याचा दाखला
पुणे : शहरातील नामांकित शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून चारित्र्याचा दाखला प्राप्त करून घेतलेल्या स्कूलबस चालकांनाच विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस राज्याच्या शिक्षण विभागाकडे केली जाणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र गोधने यांनी सांगितले.
पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात ही शरमेची गोष्ट आहे, असे नमूद करून गोधने म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांकडून चारित्र्याचा दाखला दिलेल्या व्यक्तीलाच टोल वसूल करण्याच्या कामास ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला होता. टोलवसुलीसारख्या कामासाठी संबंधित व्यक्तीच्या चारित्र्याची तपासणी केली जात असेल, तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याचीसुद्धा तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. एखादे घर भाडेतत्त्वावर घ्यायचे असेल, तरीसुद्धा संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यामुळे स्कूलबस चालकांची सर्व माहिती तपासून घ्यायला हवी.
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक स्कूलबसमध्ये महिला सहायक असणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करून गोधने म्हणाले, की एखाद्या स्कूलबसमध्ये लेडी अटेंडंट नसेल तर पालकांनी संबंधित शाळेकडे याबाबत पाठपुरावा करायला हवा. काही विद्यार्थी शाळेच्या स्कूलबसमधून येत नसतील तर ती कोणत्या वाहनामधून येतात, याबाबतची माहितीसुद्धा शाळेने सामाजिक जाणिवेतून घ्यायला हवी. शाळेला कोणत्याही विद्यार्थ्याची जबाबदारी झटकता येणार नाही.
(प्रतिनिधी)