कोरोनामुळे शाळा बंद अन् रेंजअभावी शिक्षण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:17+5:302021-07-07T04:13:17+5:30
कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाही, मात्र तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा बंद, पण शिक्षण सुरू अशी घोषणा देत सर्व ...
कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाही, मात्र तरी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शाळा बंद, पण शिक्षण सुरू अशी घोषणा देत सर्व शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. त्यानुसार शाळांनी नियोजन करून ऑनलाईन तासिका सुरू केल्यानंतर त्याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. त्यानुसार नियोजित ऑनलाईन झूम तासिका, गूगल मीट तसेच यूट्यूब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झाला.
मात्र, विद्यार्थ्यांच्या घराजवळ मोबाईल रेंजची समस्या व इंटरनेट स्पीड कमी पडत असल्यामुळे तास चालू असताना विद्यार्थी डिसकनेक्ट होत आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. रेंज व स्पीडमुळे अनेक विद्यार्थी गैरहजर असतात व त्यामुळे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांनी विद्यार्थ्यांसाठी नवे मोबाईल फोन खरेदी केले, पण रेंजअभावी त्याचा उपयोग होत नाही.
काही पालकांनी घरामध्ये स्वतःचा वायफाय घेतला त्यांच्याकडून बऱ्याचदा व्यवस्थित रेंज मिळते. मात्र ज्यांच्याकडे वायफाय नाही त्यांना तासाला सलग हजेरी लावणे शक्य होत नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अर्धवट शिकायला मिळते. सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण समजावे यासाठी शिक्षकांना पुन्हा पुन्हा तोच विषय शिकवावा लागतो त्यामुळे एकच टॉपिक अनेकवेळा शिकवावा लागत असल्यामुळे शिक्षकांचा वेळ वाया जातो व अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर मर्यादा येत आहेत.