नीरावागजमध्ये सहाव्या दिवशीही शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:51 PM2018-06-20T20:51:36+5:302018-06-20T20:51:36+5:30
ग्रामस्थांकडून आंदोलनाचा भाग म्हणून उद्या गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर शेळ्या-मेंढ्या सोडून बारामती-नीरावागज रस्ता रोखणार आहेत.
बारामती : शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी नीरावागज येथील ग्रामस्थांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्याने डोंबाळे, मदनेवस्ती येथील शाळा आजही बंद राहिली. ग्रामस्थांनी आज थाळीनाद आंदोलन केले. उद्या गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर शेळ्या-मेंढ्या सोडून बारामती-नीरावागज रस्ता रोखणार आहेत. शुक्रवार, दि. १५ शाळेच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. ‘आमचे शिक्षक नसतील, तर शाळाच नको’ अशा घोषणा पालकांनी या वेळी दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, सुधीर देवकाते, पोपटराव देवकाते, सुनील गावडे, सुरेश कोकरे, संग्राम मदने, बाळासाहेब देवकाते, अप्पासाहेब देवकाते आदी पालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम या दोघा शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले आहे. सुधीर देवकाते यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले की, उद्या शाळेच्या प्रवेशद्वारावर शेळ्या-मेंढ्या बांधून बारामती-नीरावागज रस्ता रोखण्यात येणार आहे.
तुम्ही आॅर्डर घेतल्याशिवाय इकडं यायचं नाही’
४येथील बदली झालेले शिक्षक संतोष गावडे यांनी पहिल्याच दिवशी ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली. त्यावर मात्र ग्रामस्थांनी गुरुजी तुम्ही इकडं फिरकू नका. आता तुम्ही आॅर्डर घेतल्याशिवाय इकडं यायच नाही,’ असे सांगितले.
............
आमचं शिक्षक एकच नंबर!
४आमचं शिक्षक एकच नंबर आहेत! पोरं इंग्लिश फडाफडा बोलत्याती, गणितसुदिक भारी सोडवत्यात, मोठ्या पोरांसारख फरडा इंग्लिश लिव्हत्यात. त्यामुळे गावडेगुरुजी राहिलं तर आणखी अॅडमिशन होणार आहेत. नाहीतर आम्ही दाखलं काढणारच, असे विठ्ठलराव देवकाते यांनी सांगितले.