Maratha Reservation: उद्या पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:32 PM2018-08-08T17:32:47+5:302018-08-08T17:36:08+5:30
: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.
पुणे : मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.या संबंधी त्यांनी आदेश काढला असून जिल्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांनी लेखी आदेश दिले आहेत.
मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (दि.८ऑगस्ट)रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी मोर्चे काढण्यात येणार असून आंदोलनही केले जाणार आहे. यामुळे वाहतुकीची गती कमी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणताही धोका पोहचू नये म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी आपल्या सहीने आदेश काढले आहेत. या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे की, जिल्ह्यातील व शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अभिमत विद्यापीठे यांनी त्यांच्या स्तरावर बंद ठेवावा असे नमूद करण्यात आले आहे. या दिवशी अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम सुटीच्या दिवशी पूर्ण करावा असेही आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात कोणताही अनुचित्र प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र देण्यात आले असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.