शालेय समुपदेशन निधीला ठेंगा
By admin | Published: January 30, 2015 03:47 AM2015-01-30T03:47:49+5:302015-01-30T03:47:49+5:30
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरविणारी ९० टक्के मुले वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील असतात
सुनील राऊत, पुणे
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरविणारी ९० टक्के मुले वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांमधील असतात. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व व्यक्तिमत्त्वविकासासाठी गेल्या ६ वर्षांपासून सुरू करण्यात आलेले समुपदेशन वर्ग पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद होण्याची चिन्हे आहेत. या वर्गांसाठी पालिकेच्या २०१५-१६च्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
पालिकेच्या शहरातील ३००हून अधिक शाळांमध्ये एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. कौटुंबिक अस्थिरतेचा परिणाम या मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे दर वर्षी पालिका शाळांमधील मुलांची गळती मोठ्या प्रमाणात होत असते. ही बाब लक्षात घेऊन पालिका शिक्षण मंडळ व व्यक्तिगत विकास प्रबोधिनीच्या वतीने पालिकेच्या शाळांत शालेय समुपदेशन वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यासाठी २००९मध्ये ४०, तर २०१२मध्ये १८० शाळा व या वर्षी ३०५ शाळांमध्ये हा समुपदेशन वर्ग सुरू आहे. यामध्ये गेल्या ६ वर्षांत ८० हजार विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यात २० हजार ४०८ मुलांचे वैयक्तिक समुपदेशन , तर सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांचे गट समुपदेशन करण्यात आले आहे.