जिल्ह्यातील ही शाळा ‘त्या’ विद्यार्थ्यांना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:21+5:302021-06-20T04:08:21+5:30
पोरके झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल देणार शिक्षणाचे छत्र -- कोरोनाकाळातील दु:ख हलके करण्याचा प्रयत्न : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत देणार मोफत ...
पोरके झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल देणार शिक्षणाचे छत्र
--
कोरोनाकाळातील दु:ख हलके करण्याचा प्रयत्न : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत देणार मोफत प्रवेश
---
बारामती : कोरोनाकाळात ज्या मुलांच्या डोक्यावरून आईवडलांचे छत्र हरविले, अशा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश देऊन त्यांना शैक्षणिक फीमध्ये विशेष सवलती देण्याची योजना बारामती तालुक्यातील श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावळ या शाळेने सुरू केली आहे. या योजनेमुळे आईवडलांची माया नाही तर किमान त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी दिली.
कोविडमुळे पालकांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन यंदाच्या वर्षातील शैक्षणिक शुल्क न वाढविता त्या फीमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आजी-माजी सैनिकांच्या मुलांना देखील मोफत शिक्षण, मुलींच्या फीमध्ये २० टक्के सवलत, अनाथ मुलांना मोफत शिक्षण, वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना फी मध्ये ५० टक्के सवलत, आदी सवलती देऊन शाळेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
विशेष सवलती देण्यासाठी नेहमीच प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच, संस्थेचे इतर पदाधिकारी संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, अलका आटोळे, पल्लवी सांगळे, ललित भरणे, दीपक सांगळे, दीपक बिबे, सीईओ संपत जायपात्रे, विभागप्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, राधा नाळे, निलीमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर यांचाही पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे.
————————————————