विनोदाच्या शाळेचा अस्त...
By admin | Published: February 8, 2015 01:49 AM2015-02-08T01:49:46+5:302015-02-08T01:49:46+5:30
विनोदी नटाला जो भाबडेपणा आवश्यक असतो, तो बापूंच्या ठायी होता. अतिशय इनोसन्ट असे ते व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांच्या घरात राहिलो आहे.
विनोदी नटाला जो भाबडेपणा आवश्यक असतो, तो बापूंच्या ठायी होता. अतिशय इनोसन्ट असे ते व्यक्तिमत्त्व होते. मी त्यांच्या घरात राहिलो आहे. त्यांचे व माझे कौटुंबिक असे नाते होते. त्यांच्या विनोदात गोडवा होता. अनेक नटांना चेहऱ्यावर गोडवा आणण्यासाठी मेहनत करावी लागते; मात्र बापूंच्या चेहऱ्यात हा गोडवा मुळापासूनच होता. ते त्याचे वरदान घेऊनच आले होते. त्यांच्यात एक मूल दडलेले होते. त्यांच्यात एक प्रकारचा निरागसपणा होता.
मी त्यांच्यासोबत नाटकात कामेही केली आहेत. ‘चोरावर मोर’, ‘काका किशाचा’ अशी नाटके त्यांच्याबरोबर करण्यात एक प्रकारचा आनंद होता. देवनारला त्यांचा एक बंगला होता आणि नाटकाच्या तालमी वगैरे इतर कुठल्या हॉलमध्ये नव्हे; तर त्यांच्या बंगल्यात व्हायच्या. कलाकार तर त्यांच्या घरीच राहायला असायचे आणि अगदी घरगुती स्वरूपात तिथे आमच्या तालमी व्हायच्या. त्यांच्याकडे कलाकारांची बडदास्त उत्तम राखली जात असे. बापू अतिशय कुटुंबवत्सल होते. हसवण्याची किमया त्यांना उपजतच होती. विनोदासाठी लागणारा भाबडेपणा त्यांच्या अंगात आणि अभिनयात सामावला होता.
बापूंनी विविध माहितीपटांतही अप्रतिम कामे केली आहेत. ‘जीवन विमा’ची त्यांची जाहिरात आजही विसरता येत नाही. मीसुद्धा त्यांच्यासोबत माहितीपट आणि जाहिरातींत कामे केली आहेत. जे म्हणायचे आहे, तो आशय त्यांच्या डोळ्यांतून सार्थ व्यक्त व्हायचा. बापू म्हणजे विनोदाची शाळाच होती. या शाळेचा आता अस्त झाला आहे.
- विजय गोखले, अभिनेता-दिग्दर्शक
बापूंविषयी आम्हाला प्रचंड आदर होता. विनोदी नाटकांसाठी त्यांनी जे काही केलंय त्याला तोडच नाही. त्यांचे निधन ही अतिशय दु:खदायक घटना आहे.
- आशालता वाबगावकर, ज्येष्ठ अभिनेत्री
त्यांचा व माझा परिचय गेल्या पन्नास वर्षांचा होता. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकात आम्ही प्रथम काम केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लाल बंगली’ या नाटकातही मी काम केले होते. ते आमच्या घराच्या जवळ राहत असल्याने आमची नेहमी भेट होत असे. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे, कारण त्यांच्यासारखा हरहुन्नरी कलावंत माझ्या पाहण्यात फार दुर्मीळ आहे.
- जयंत सावरकर, ज्येष्ठ अभिनेते
बापूंच्या जाण्याने फार्सचा बाप गेला अशी भावना माझ्या मनात आहे. रंगभूमीवर जेव्हा स्थैर्य नव्हते; तेव्हा नोकरी सांभाळून त्यांनी अत्यंत वेगळ्या प्रकारची आणि लोकांना हसवणारी नाटके दिली. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. तो अतिशय ग्रेट माणूस होता.
- प्रमोद पवार, अभिनेता
नाटकांमध्ये जो वेगळा प्रवाह आला त्यात आत्माराम भेंडे यांचे मोठे श्रेय आहे. मग दुसऱ्या भाषेतली नाटके मराठीत आणणे असू दे किंवा फार्सला वेगळा आयाम मिळवून देणे असो; भारतीय विद्या भवनच्या स्पर्धा सुरू करणे असो, आयएनटी असो, त्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक