मोहरी, जांभळी केंद्राच्या शाळा डिजिटल
By admin | Published: April 11, 2016 12:38 AM2016-04-11T00:38:48+5:302016-04-11T00:38:48+5:30
शैक्षणिक लौकिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा वाढत असताना अत्यंत विचारपूर्वक ज्ञानरचनावादाचा स्वीकार केलेला आहे
कापूरव्होळ : शैक्षणिक लौकिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा वाढत असताना अत्यंत विचारपूर्वक ज्ञानरचनावादाचा स्वीकार केलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोबाईल डिजिटल मिशनद्वारे परिपूर्ण होत आहेत. हे आधुनिक शिक्षण क्रांतीचे नवे पर्व सुरू होत असल्याचे मत भोर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांनी केले.
केतकावणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘मोबाईल डिजिटल मिशन’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात जांभळी व मोहरी या केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मोबाईल डिजिटल मिशनने शंभर टक्के परिपूर्ण करण्यात आल्या.
भोर तालुक्यात असा उपक्रम प्रथमच या दोन्ही केंद्रांनी यशस्वी केला. महाजन यांच्या हस्ते केंद्रप्रमुख मा. न. गायकवाड व शिवाजी
जाधव यांच्या अथक परिश्रमातून मोबाईल डिजिटल किट पारवडी, कुरूंगवडी, जांभळी, सोनवडी, सांगवी, वीरवाडी, केतकावणे, कोळवडी, मोहरी खुर्द व मोहरी बुद्रुक, हातवे बुद्रुक, हातवे खुर्द, मादगुडेवाडी, भिलारेवाडी, धनगरवस्ती, देऊळवाडी, सुतारवाडी, तांबाड
एक व तांबाड दोन या शाळांना देण्यात आले.
यानंतर भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती रोहिणी बागल यांनी जांभळी व मोहरी केंद्रातील सर्व शाळांच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
या वेळी शिवाजी जाधव यांनी तयार केलेले गुणवत्ता विकास किट हे ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याचे पुस्तक उपस्थित मार्गदर्शकांना भेट
देण्यात आले.(वार्ताहर)
> धांगवडी शाळेत शंभर टक्के पटनोंदणी
कापूरव्होळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शासनस्तरावरून राबवीत असताना गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शंभर टक्के पटनोंदणीची गुढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांगवडी यांनी उभारून दमदार व आल्हाददायक वातावरणात इयत्ता पहिलीचा प्रवेश उत्सव साजरा झाल्याची माहिती मुख्याध्यापिका शोभा कामठे यांनी दिली.हा उपक्रम आठ ते पंधरा एप्रिलपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमधून सुरू राहणार असल्याची माहिती आळंदीचे केंद्रप्रमुख सु. ना.आवाळे यांनी दिली.
या वेळी धांगवडीच्या सरपंच संगीता तनपुरे, उपसरपंच मा. म. तनपुरे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गोकुळ बारणे, राजेंद्र गाढवे, दीपिका केदारी, पंचशीला कांबळे, स्वाती देशमाने आदी उपस्थित होते.(वार्ताहर)